पाकिस्तान क्रिकेटमध्ये कॅप्टन बदलण्याचा संगीत खुर्ची उपक्रम सुरूच आहे. रावळपिंडी टेस्ट सुरू असतानाच पाकिस्तानने नव्या वनडे कर्णधाराची घोषणा केली आहे. विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवानच्या ऐवजी वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदीकडे वनडे संघाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे सीरिज आफ्रिदीसाठी पहिली मोहीम असेल. आशिया चषकाची ट्रॉफी स्वत:कडे ठेवणाऱ्या मोहसीन नक्वींच्या कार्यकाळात पाकिस्तानचा हा तिसरा कर्णधार असेल.

आफ्रिदीने पाकिस्तान संघाचं नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी आफ्रिदीकडे पाकिस्तानच्या टी२० संघाची धुरा सोपवण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने पाकिस्तान संघाचं नेतृत्व केलं. पाकिस्तानला पाचपैकी एक सामना जिंकता आला होता. काही महिन्यांनंतर आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं. बाबर आझमची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यालाही अपयश आल्याने सलमान अली अघाकडे टी२० संघाची सूत्रं देण्यात आली.

वनडे आणि टी२० प्रकारातील प्रशिक्षक माईक हेसन, हाय परफॉर्मन्स डिरेक्टर आकिब जावेद आणि निवडसमिती यांच्यातील बैठकीनंतर आफ्रिदीला वनडे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं. रिझवानने २० वनडेत पाकिस्तानचं नेतृत्व केलं. रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला २-१ असं नमवलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-० असं निर्भेळ यश मिळवलं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मात्र पाकिस्तानची कामगिरी सर्वसाधारण राहिली. दोन सामन्यांनंतर पाकिस्तानचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. वनडे कर्णधार म्हणून रिझवानच्या नावावर ९ विजय आणि ११ पराभव आहेत.

रिझवान आणि आफ्रिदी दोघेही रावळपिंडी टेस्ट खेळत आहेत. टेस्ट सुरू असतानाच पहिल्या दिवसाच्या खेळानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही घोषणा केली. २५वर्षीय शाहीन शहा आफ्रिदीने ३२ टेस्ट, ६६ वनडे आणि ९२ टी२० सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे.