बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीची पाठराखण केली आहे. नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत धोनीला त्याच्या संथ खेळीमुळे टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. मात्र धोनीचं संघात असणं हे भारतीय संघासाठी अत्यंत गरजेचं असल्याचं प्रसाद म्हणाले.

“तो अजुनही मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे, इतर खेळाडू अजुनही शिकतायत. धोनी हा भारतीय संघाची ताकद आहे, यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून तो त्याची कामगिरी उत्तम बजावतो आहे. नवोदीत खेळाडूंना मार्गदर्शन करण्यापासून ते थेट मैदानात खडतर प्रसंगात निर्णय घेण्यासाठी कोहलीला मदत करणं असो….धोनीचा अनुभव प्रत्येक वेळी कामाला येतो.” पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद बोलत होते.

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, धोनीवर निवृत्तीचा दबाव वाढत होता. मात्र धोनीने आपल्या निवृत्तीबद्दलचं कोणतही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. सध्या दोन महिने धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचं ठरवलं आहे. तो सध्या भारतीय सैन्यात आपली भूमिका बजावतो आहे. धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे भारतीय संघ या दौऱ्यात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.