‘‘दडपणाविषयी माणसं नकारात्मक पद्धतीनं विचार करतात. माझ्यासाठी दडपण म्हणजे अतिरिक्त जबाबदारी असते. मी तरी याच पद्धतीने त्याकडे पाहतो. जेव्हा देव तुम्हाला तुमच्या देशासाठी किंवा संघासाठी नायक होण्याची संधी देतो, तेव्हा तुम्ही त्याला दडपण कसे म्हणाल!’’.. हे महेंद्रसिंग धोनीने मांडलेले विचार त्याचं व्यक्तिमत्त्व स्पष्ट करतात. सहा वर्षांपूर्वी धोनीकडे भारतीय क्रिकेटचे कर्णधारपद असंच अपघातानं चालून आलं. दिल्ली कसोटीच्या अखेरच्या दिवशी अनिल कुंबळेनं नेतृत्वाचा आणि कारकीर्दीचाही त्याग केला. धोनीनंही नेमकं तेच केलं. निवृत्तीचा निर्णय तडकाफडकी घेऊन त्यानं अनेक प्रश्नांपुढे पूर्णविराम देऊन टाकला, तसेच अनेक प्रश्नचिन्ह निर्माणही केले. या दोन्ही घटनांचा समान धागा म्हणजे प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलियाचा होता. धोनीच्या नेतृत्वाच्या काळाचा लेखाजोखा मांडल्यास खालून वर अगदी उंच जाऊन नंतर पुन्हा खाली येणारा आलेख हा आपलं लक्ष वेधतो. धोनीनं भारताला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान प्राप्त करून दिलं होतं. पण ते गमावायला वेळ लागला नाही. धोनीनं निवृत्तीचा धक्का दिल्यावर काही माजी क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे की, धोनीनं कर्णधारपद सोडणं, हे ठीक आहे. परंतु खेळाडू म्हणून कारकीर्द संपवायची मुळीच आवश्यकता नव्हती!
फिरोझशाह कोटलावर २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी भारतानं अनिर्णीत राखली. परंतु दुखापती आणि फॉर्मशी झुंजणारा कसोटी संघनायक अनिल कुंबळेनं अचानक निवृत्ती पत्करली. मग कुंबळेनं सहा खेळाडूंसह मैदानावर एक फेरी मारून चाहत्यांना अलविदा केला. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्याच खांद्यावर कुंबळे विराजमान होता. नेमकं हेच भारतीय संघाचं भवितव्य आहे, हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत होतं. उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी प्रभारी कर्णधार म्हणून धोनीची नेमणूक करण्यात आली. पाहता-पाहता भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिकाच खिशात घातली. त्याआधी सप्टेंबर २००७मध्ये माहीनं भारताला ट्वेन्टी-२०चा विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम करून दाखवला होता. एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील कर्णधारपद भूषवणारा धोनी कसोटीमधील उपकर्णधारपद सांभाळत होता. मग भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं धोनीकडेच मोठय़ा विश्वासानं कसोटी कर्णधारपदही दिलं. ‘हात लावेल त्याचं सोनं होईल..’ या मिडास राजाच्या गोष्टीप्रमाणे धोनीच्या आयुष्यात सारं काही स्वप्नवतच घडत होतं. ६ डिसेंबर २००९मध्ये भारतीय संघानं कसोटी क्रिकेटमधील सम्राटपद अर्थात जागतिक कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान काबीज केलं. मग २ एप्रिल २०११ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. धोनीनं भारताला चक्क एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक जिंकून दिला.
इथपर्यंत सर्व काही स्वप्नवत घडत होतं, परंतु भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला आणि तिथूनच कसोटीमधील भारतीय क्रिकेटचा आलेख खालच्या दिशेने वाटचाल करू लागला. धोनीच्या नेतृत्वाच्या कालखंडात भारतीय संघानं ६० पैकी २१ विजय मिळवले, परंतु परदेशात भारतानं ३० पैकी फक्त ६ विजय मिळवले. ही आकडेवारी बरीचशी बोलकी आणि बोचणारी आहे. भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ा तयार करून कोणत्याही प्रतिस्पध्र्याला नामोहरम करता येतं, या आत्मविश्वासालासुद्धा इंग्लंडनं तडा दिला होता. त्यामुळेच धोनीची निवृत्ती आणि विराट कोहलीकडे नेतृत्वाची जबाबदारी चालून येणार, हे अपेक्षित होतं.
कसोटी क्रिकेटमधील परदेशातील पराभवांची आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांविरुद्धची खराब कामगिरी ही प्रामुख्यानं अधोरेखित होते. परंतु ही रडकथा काही नवी नाही. फक्त गेल्या काही वर्षांमध्ये वेस्ट इंडिज हे नाव यातून कमी झालं आहे. शेरेबाजी ही ऑस्ट्रेलियाचं प्रमुख अस्त्र. याशिवाय मैदानावरील या दोन संघांमधील हाडवैर कमालीचं गाजल्याचे इतिहास सांगतो. इंग्लंडचे खेळाडूही भारतीयांशी अशाच प्रकारे आक्रमकता जोपासतात. या सर्व संघांच्या आक्रमक स्वभावाला तितक्याच त्वेषानं उत्तर देण्यासाठी आक्रमक संघनायक हवा, असं बऱ्याच मंडळींना वाटत होतं. पण ‘कॅप्टन कुल’ असं बिरूद मिरवणारा धोनी शांतपणे या हेकेखोर प्रतिस्पध्र्याना सामोरा जायचा. काही वष्रे मागे गेल्यास सौरव गांगुलीच्या आक्रमक वृत्तीमुळे भारतीय संघाचं प्रतिस्पध्र्यावर कसं दडपण यायचं, हे आपण पाहिलं आहे. विराट कोहलीमध्ये नेमके हेच गुण आहेत. ‘अरे’ला ‘का’रे करता येण्याचा बेडरपणा, हेच त्याचं बलस्थान ठरलं. अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत त्यानं आपल्या झुंजार फलंदाजीसह कर्णधारपदाचं दर्शन घडवलं. समोरच्या बाजूनं एकेक फलंदाज बाद होत गेले आणि भारताला ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला. याशिवाय मिचेल जॉन्सनसारख्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजाला शेरास-सव्वाशेर पद्धतीनं त्यानं खुन्नस दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन मंडळींनी आपलं शेरेबाजीचं हत्त्यार म्यान करून आम्ही चांगलं क्रिकेट खेळतोय, असं कौतुकानं सांगितलं.
गेल्या तीन वर्षांमधील प्रत्येक पराभूत मालिकेनंतर भारतीय संघ संक्रमणातून जात आहे, असं धोनी सांगायचा. हे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारं होतं. या कालखंडात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, हरभजन सिंग हे प्रमुख खेळाडू भारताच्या कसोटी क्षितिजावरून लुप्त झाले. जुन्यांची जागा नव्या ताज्या दमाच्या खेळाडूंनी घेतली. कोहलीसह मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा ही मंडळी कसोटी क्रिकेटमध्ये आता स्थिरस्थावर झाली आहेत. याच संक्रमणाचा शेवट धोनीच्या निवृत्तीनं होईल, हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं.
धोनीनं निवृत्ती का पत्करली, याचं कोडं अद्याप गुलदस्त्यात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे संघसंचालक यांचं विराटप्रेम, धोनीवर होणारा हितसंबंधांचा आरोप आदी अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत. परंतु धोनीच्या निवृत्तीचं एक वैशिष्टय़ म्हणजे सचिन, गांगुली, कुंबळेसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या अखेरच्या कालखंडात त्यांची कारकीर्द अस्ताला जाते आहे, हे स्पष्टपणे दिसत होतं. प्रसारमाध्यमांच्या निवृत्तीच्या सल्ल्यांची पर्वा न करता ते खेळले आणि स्वत:ला हवं तेव्हा किंवा बीसीसीआयच्या धुरिणांकडून सूचना आल्यावर त्यांनी कारकीर्दीपुढे पूर्णविराम दिला. परंतु धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्याची अजूनही वेळही आली नव्हती, परंतु त्यानं स्वत:हून आपला कसोटीच्या रंगमंचावरील प्रवेश संपवला, हेच त्याचं मोठेपण आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तूर्तास तरी नवा संघनायक विराट कोहलीला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ या!
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2015 रोजी प्रकाशित
एक पूर्णविराम अनेक प्रश्नचिन्ह!
‘‘दडपणाविषयी माणसं नकारात्मक पद्धतीनं विचार करतात. माझ्यासाठी दडपण म्हणजे अतिरिक्त जबाबदारी असते. मी तरी याच पद्धतीने त्याकडे पाहतो.

First published on: 04-01-2015 at 05:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni retirement from test cricket raises many questions