लंडन : इंग्लंडमधील आघाडीचा फुटबॉल क्लब लिव्हरपूलच्या खरेदीसाठी भारतीय अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानींनी तयारी दाखवली आहे. इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले.लिव्हरपूरलची सध्याची मालकी फेनवे स्पोर्ट्स ग्रुपकडे (एफएसजी) आहे. ‘एफएसजी’ने ऑक्टोबर २०१० मध्ये लिव्हरपूल फुटबॉल क्लबची खरेदी केली होती. मात्र आता ‘एफएसजी’ने या क्लबच्या विक्रीचा निर्णय घेतला असून, ते या विक्रीच्या प्रक्रियेसाठी गोल्डमन सॅश आणि मॉर्गन स्टॅनले यांची मदत घेणार आहेत.
‘एफएसजी’ने लिव्हरपूलच्या विक्रीसाठी चार अब्ज पौंड इतकी किंमत निश्चित केली आहे. ‘‘लिव्हरपूलमध्ये भागधारक होण्यासाठी अनेक कंपन्यांकडून वारंवार विचारणा होत आहे. योग्य अटी आणि शर्तीमध्ये हे नवे भागधारक बसत असतील आणि त्याचा लिव्हरपूल संघाला फायदा होणार असेल, तर आम्ही अशा नव्या भागधारकांचा जरूर विचार करू,’’ असे ‘एफएसजी’ने स्पष्ट केले आहे.लिव्हरपूलच्या मालकीसाठी उत्सुक असलेल्या अंबानींच्या कंपनीकडे सध्या ‘आयपीएल’मधील मुंबई इंडियन्स संघाची मालकी आहे.