सध्या सुरू असलेल्या विजय हजारे चषक एकदिवसीय स्पर्धेत बुधवारी मुंबईच्या यशस्वी जैस्वाल याने ऐतिहासिक कामगिरी केली. यशस्वीने दमदार द्विशतक झळकावत झारखंडविरुद्ध मुंबईला ३ बाद ३५८ धावांचा डोंगर उभा करून दिला. यशस्वी आणि आदित्य तरे यांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. त्यात तरेने १०२ चेंडूत ६ चौकार व १ षटकार लगावत ७८ धावा ठोकल्या. सिद्धेश लाड (३२) आणि श्रेयस अय्यर (नाबाद ३१) यांनीही फटकेबाज खेळी केली. पण यशस्वीने मात्र प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडलेय. त्याने १५४ चेंडूंत १७ चौकार व १२ षटकार ठोकत २०३ धावा कुटल्या. यशस्वीने त्याच्या या द्विशतकी खेळीच्या जोरावर विविध विक्रमांना गवसणी घातली. मुंबईकडून खेळताना त्याने २१२ धावा केल्या. अ श्रेणी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूने झळकावलेले हे नववे द्विशतक ठरले. तसेच तो द्विशतक ठोकणारा सातवा फलंदाज ठरला. याशिवाय १७ वर्षांचा यशस्वी अ श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम यशस्वीने केला. Shattered 44-year-old record First teenager to a List A 200 Most sixes in a #VijayHazare match 3rd List A ton in just his 5th List A match Yashasvi Jaiswal is on #EkdumMumbai — T20 Mumbai (@T20Mumbai) October 16, 2019 तसेच यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेतील हे दुसरे द्विशतक ठरले. केरळच्या संजू सॅमसनने काही दिवसांपूर्वीच गोवा संघाविरुद्ध २१२ धावा केल्या होत्या. अ श्रेणी क्रिकेटमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक ३ द्विशतके झळकावली आहेत. तर विरेंद्र सेहवाग, शिखर धवन, सचिन तेंडुलकर, कर्ण वीर आणि संजू सॅमसन यांनी १-१ द्विशतक ठोकली आहेत. त्यांच्या पंगतीत त्याने स्थान मिळवले.