दुष्काळात तेरावा महिना, अशीच काहीशी स्थिती मुंबईच्या रणजी संघाची झाली आहे. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा हे मुंबईचे फलंदाजीचे दोन भक्कम आधारस्तंभ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. संघात बहुदा पहिल्यांदाच तीन फलंदाजांनी पदार्पण केले आहे. मुंबईची फलंदाजी ही वासिम जाफरवर अवलंबून आहे, असे मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटले होते. पण जम्मू काश्मीरविरुद्धच्या पहिल्याच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वासिम जायबंदी झाल्यामुळे मुंबईला अजून एक जोरदार धक्का बसला आहे.
शुभम खजुरिया १०४ धावांवर असताना अभिषेक नायरच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये वासिमने झेल सोडला. हा चेंडू त्याच्या हातावर जोरात बसला आणि त्यामुळेच उपहारानंतर तो मैदानात उतरलाच नाही. त्याचबरोबर तिसऱ्या सत्रात एकामागून एक फलंदाज बाद होत असताना फलंदाजी करण्यासाठी मुंबईला वासिमसारख्या अनुभवी फलंदाजाची मैदानात गरज होती. पण जायबंदी वासिम फलंदाजीला मैदानात उतरू शकला नाही.
‘‘वासिमच्या हाताला दुखापत झाली असल्याने त्याला किमान तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये खेळणे धोकादायक होऊ शकते,’’ असे मुंबई संघातील सूत्रांनी सांगितले आहे. जर वासिम तीन आठवडे खेळू शकणार नसेल, तर मुंबईची स्थिती आणखी बिकट होऊ शकते. जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या सामन्यात तर वासिमची संघाला नितांत गरज असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वासिम या सामन्यात फलंदाजीला उतरला नाही तर मुंबईला कोण तारणार? हाच प्रश्न सध्या दर्दी मुंबईकरांना पडला आहे.