३० गोल नोंदवित पंजाबचा विक्रमी विजय
वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धा
बलाढय़ पंजाबने नावलौकिकास साजेसा खेळ करीत गुजरातचा ३०-० असा धुव्वा उडवित विक्रमी विजय नोंदविला. अन्य लढतीत मुंबईने महाराष्ट्रावर २-१ असा निसटता विजय मिळविला.
शिवछत्रपती क्रीडानगरी व मेजर ध्यानचंद स्टेडियम या दोन ठिकाणी ही स्पर्धा सुरु आहे. पंजाबने आपल्या पहिल्याच सामन्यात स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम केला. त्या वेळी त्यांच्याकडून सिमरनजितसिंग याने सहा गोल केले, तर इंद्रजितसिंग याने पाच गोल नोंदविले. सरवणजितसिंग याने चार गोल करीत त्यांना चांगली साथ दिली. तामिळनाडूने राजस्थानला २०-० अशी धूळ चारली, त्याचे श्रेय विनोद नायर याने केलेल्या पाच गोलांना द्यावे लागेल. व्ही.षणमुगम, अशोककुमार, सुरेशकुमार, गुणशेखरन यांनी प्रत्येकी तीन गोल केले.
चुरशीने झालेल्या लढतीत मुंबईने महाराष्ट्राला २-१ असे हरविले. सामन्याच्या १७ व्या मिनिटाला जयेश जाधव याने मुंबईचे खाते उघडले. ५६ व्या मिनिटाला महाराष्ट्राच्या रुबेन केदारी याने गोल करीत बरोबरी साधली, मात्र आणखी चार मिनिटांनी महाराष्ट्राच्या बचाव फळीतील खेळाडूंच्या चुकीमुळे स्वयंगोल नोंदविला गेला. हा गोल महाराष्ट्राच्या पराभवास कारणीभूत ठरला.
विनोद सिंग याने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर रेल्वे संघाने भोपाळचे आव्हान ११-२ असे सहज परतविले. त्यांचा हा तिसरा विजय आहे. जसजितसिंग याने दोन गोल करीत त्याला चांगली साथ दिली. भोपाळ संघाकडून अश्रफ उल रहेमान व इरफान अली यांनी प्रत्येकी एक गोल केला.
उत्तरप्रदेशने अंदमान-निकोबार संघाविरुद्ध २-२ अशी बरोबरी स्वीकारली. मध्यप्रदेशने पुडुचेरी संघावर ६-१ अशी मात केली.
राष्ट्रीय हॉकी निवड समितीच्या अध्यक्षपदी बी.पी.गोविंदा
नवी दिल्ली : माजी ऑलिम्पिकपटू बी. पी. गोविंदा यांची राष्ट्रीय हॉकी निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने एका परिपत्रकाद्वारे ही समिती जाहीर केली. महासंघाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत निवड समिती निश्चित करण्यात आली. उदयोन्मुख नैपुण्य शोध व विकासाची जबाबदारीही या समितीवर सोपविण्यात आली आहे. निवड समिती : बी.पी.गोविंदा (अध्यक्ष), सईद अली, डॉ.आर.पी.सिंग, गगन अजितसिंग, अर्जुन हलप्पा, सावित्री पूर्ती, ममता खारब, सुरिंदर कौर, सबा अंजुम.