Shane Bond Slams Mumbai Indians Bowlers, LSG vs MI : इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये एकाहून एक अटीतटीचे सामने होत असून मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातही रंगतदार सामना झाला. लखनऊने मुंबईसमोर विजयासाठी १७८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. परंतु, या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात अटीतटीची लढत झाली. मुंबईला ११ धावांची गरज असताना मोहसिन खानने फक्त ६ धावा देत लखनऊला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी पहिल्या इनिंगमध्ये लखनऊच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला.

लखनऊचा धडाकेबाज फलंदाज मार्कस स्टॉयनिसने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे मुंबईच्या संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक शेन बॉंड यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईला शेवटचे पाच षटक खूप महागात पडले. लखनऊच्या फलंदाजांनी तीन षटकात ५० हून अधिक धावा केल्या. त्यामुळे बॉंडने मुंबईच्या गोलंदाजांना सुमार कामगिरी केल्यामुळं चांगलंच सुनावलं. सामना संपल्यानंतर बॉंडने माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

नक्की वाचा – “नवीन भावा तू आंबा खा फक्त…”, ‘या’ अभिनेत्याच्या ट्वीटमुळं क्रीडाविश्वात खळबळ, कोहलीचे चाहते म्हणाले…

बॉंडने पत्रकार परिषदेत म्हटलं, “आम्ही आखलेल्या रणनितीनुसार मुंबई इंडियन्सची गोलंदाजी झाली नाही. त्यामुळे मी गोलंदाजांवर नाराज आहे. आम्ही या रणनितीबाबत चर्चाही केली होती. स्टॉयनिससारख्या खेळाडूला या खेळपट्टीवर बाद कसं करायचं, त्यासाठी कुठे गोलंदाजी करायची, याबाबत गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यात आलं होतं. परंतु, या सामन्यात रणनितीप्रमाणे गोलंदाजी झाली नाही. गोलंदाजांनी एकसारख्याच चुका केल्या. स्टॉयनिस एक जबरदस्त खेळाडू आहे.

आम्हाला माहित होतं की, तो खेळपट्टीवरून थेट मोठे शॉट खेळेल आणि त्याला अशी फलंदाजी करायला आम्ही मदत केली. स्टॉयनिसच्या या स्फोटक फलंदाजीमुळं लखनऊची धावसंख्या वेगानं वाढली. त्याने ४७ चेंडूत ८९ धावा कुटल्या. या इनिंगमध्ये त्याने आठ षटकार ठोकले. तसंच कर्णधार कृणाल पांड्यासोबत ८२ धावांची भागिदारीही केली.”