Mumbai Indians Post For Rohit Sharma: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २००७ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना ४० चेंडूत ५० धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सेमीफायनल सामन्यात दमदार खेळी करून त्याने पहिल्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. सप्टेंबर २००७ ते जून २०२४ हा १७ वर्षांचा प्रवास रोहितसाठी एका चित्रपटापेक्षा कमी नव्हता. टी-२० वर्ल्डकप स्पर्धा जिंकून त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीची सुरूवात केली होती. २०२४ मध्ये आपल्या नेतृत्वाखाली खेळताना भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकवून त्याने टी-२० क्रिकेटला रामराम केलं.
रोहितसाठी मुंबई इंडियन्सची खास पोस्ट
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये रोहितचा टी-२० वर्ल्डकप २००७ स्पर्धेतील फोटो आणि २०२४ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील ट्रॉफीसोबतचा फोटो एकत्रित करण्यात आला आहे. या फोटोवर हटके कॅप्शन देखील देण्यात आलं आहे. या फोटोवर, “बोरिवलीतील एका मुलाने विश्वविजेता होण्यासाठीचा प्रवास सुरू केला..”, असं लिहिलं आहे.
रोहितने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २००७ स्पर्धेतून आपल्या टी-२० कारकिर्दीची सुरूवात केली होती. ही स्पर्धा जिंकून देण्यात रोहितनेही मोलाचं योगदान दिलं होतं. २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माकडे होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेने पराभूत करत दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.
पण ही स्पर्धा त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा ठरली. ही स्पर्धा झाल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहितने मुंबई इंडियन्सला ५ वेळेस आयपीएलची ट्रॉफी देखील जिंकून दिली. २०११ पासून तो या संघाचं प्रतिनिधित्व करत आहे.
रोहितला आयपीएल स्पर्धेत २७२ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान २९.७ च्या सरासरीने ७०४६ धावा केल्या आहेत. यदरम्यान त्याने २ शतकं आणि ४७ अर्धशतकं झळकावली आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला १५९ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ३२.० च्या सरासरीने ४२३१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ शतकं आणि ३२ अर्धशतकं झळकावली आहेत.