मेलबर्न : कारकीर्दीतील विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅमच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने मंगळवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत झंझावाती विजय नोंदवून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. तर जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या अ‍ॅश्ले बार्टीने प्रतिस्पर्धीवर सहज मात करताना वर्चस्वमालिका कायम राखली.

रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्यपूर्व लढतीत स्पेनच्या सहाव्या मानांकित नदालने कॅनडाच्या १४व्या मानांकित डेनिस शापोवालोव्हचे आव्हान ६-३, ६-४, ४-६, ३-६, ६-३ असे तब्बल पाच सेटमध्ये मोडीत काढले. चार तास आणि १२ मिनिटे रंगलेला हा सामना जिंकून ३५ वर्षीय नदालने सातव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी त्याची इटलीच्या सातव्या मानांकिन मॅटेओ बेरेट्टिनीशी गाठ पडेल.

नदालने यापूर्वी २००९मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली होती. मंगळवारी २-० अशा आघाडीवर असताना शापोवालोव्हने झोकात पुनरागमन केल्यामुळे नदाल काहीसा थकलेला जाणवला. त्याने पाचव्या सेटपूर्वी वैद्यकीय विश्रांतीही घेतली. मात्र निर्णायक सेटमध्ये सुरुवातीलाच सव्‍‌र्हिस ब्रेक करून नदालने विजय सुनिश्चित केला.

महिलांमध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित बार्टीने अमेरिकेच्या २१व्या मानांकित जेसिका पेगुलाचा ६-२, ६-० असा अवघ्या एका तासात धुव्वा उडवला. बार्टीने आतापर्यंत स्पर्धेत एकही सेट गमावलेला नसून तीन सामन्यांत तिने ६-० अशा फरकाने प्रतिस्पर्धीला धूळ चारली आहे. नाओमी ओसाका, अरिना सबालेंका यांचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे २५ वर्षीय बार्टीला प्रथमच ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

बार्टीसमोर गुरुवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत अमेरिकेच्या बिगरमानांकित मॅडिसन कीजचे आव्हान असेल. कीजने उपांत्यपूर्व सामन्यात फ्रेंच विजेत्या चौथ्या मानांकित बाबरेरा क्रेजिकोव्हाला ६-३, ६-२ असे सरळ दोन सेटमध्ये नेस्तनाबूत केले. कीजने २०१५नंतर प्रथमच या स्पर्धेतील अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळवले आहे.

सानियाच्या पराभवासह भारताचेही आव्हान संपुष्टात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा सहकारी राजीव राम यांना मंगळवारी मिश्र दुहेरीतून गाशा गुंडाळावा लागला. उपांत्यपूर्व लढतीत जेसन कुब्लर आणि जेमी फोर्लिस या बिगरमानांकित ऑस्ट्रेलियन जोडीने सानिया-राजीव यांचा ६-४, ७-६ (७-५) असा सरळ दोन सेटमध्ये आणि १ तास, १४ मिनिटांत पराभव केला. काही दिवसांपूर्वीच निवृत्तीची घोषणा करणाऱ्या सानियाचा हा ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील अखेरचा सामना ठरला. तिच्या पराभवासह भारतीय खेळाडूंचे या स्पर्धेतील अभियानही समाप्त झाले.