२०१९ मध्ये २१ सुवर्णपदकांसह भारताची लक्षवेधी भरारी

सुप्रिया दाबके, लोकसत्ता

मुंबई : भारताच्या नेमबाजांनी २०१९मध्ये २१ सुवर्णपदकांसह जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवल्याबद्दल राष्ट्रीय रायफल संघटनेचे (एनआरएआय) अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी नुकतेच एक ‘ट्वीट’ करून नेमबाजांचे कौतुक केले आहे. ही कामगिरी करताना भारताने ऑलिम्पिकमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या चीन (११ सुवर्ण) आणि अमेरिका (६ सुवर्ण) या देशांनाही सहज मागे टाकले आहे. भारताच्या या यशात दीपाली देशपांडे आणि सुमा शिरुर या अनुक्रमे वरिष्ठ आणि कनिष्ठ संघांच्या प्रशिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.

सुमा शिरुर, अंजली भागवत, दीपाली देशपांडे या महाराष्ट्राच्या मुलींनीच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीत पदके जिंकून दाखवता येतात, हे साऱ्या देशाला दाखवून दिले. अर्थातच त्यांच्यामागे संजय चक्रवर्ती, भीष्मराज बाम यांचे मोलाचे योगदान होते. आता मार्गदर्शनाची जबाबदारी सांभाळताना या दोघींनीही देशभरातील नेमबाजीच्या प्रचारात राज्याचे योगदान मोलाचे असल्याचे म्हटले आहे.

‘‘नेमबाजी हा सध्या ऑलिम्पिकमध्ये पदकाची हमी देणारा खेळ बनला आहे. मात्र देशात नेमबाजीचे महत्त्व वाढायला महाराष्ट्राने सुरुवात केली. सुरुवातीला मी, सुमा, अंजली आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकायला लागलो. त्यानंतर नवनवीन पिढय़ा नेमबाजीत यायला लागल्या. महाराष्ट्रानंतर आता देशभरात अनेक ठिकाणी नेमबाजीसाठी दर्जेदार सुविधा निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्र रायफल संघटनेने प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजीसाठी उत्तम सुविधा दिल्या आहेत. शालेय स्तरावर होणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये नेमबाजी हा खेळ प्रथमच समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले,’’ असे दीपाली यांनी सांगितले.

‘‘आम्ही प्रशिक्षक म्हणून तर भारतीय संघासोबत आहोतच. पण आमच्या राष्ट्रीय संघटनेत अशोक पंडित, शीला कनुंगो हे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत. तेदेखील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देणे, सराव शिबिरांचे यशस्वीपणे आयोजन करणे, निवड समितीचे धोरण ठरवण्यात योगदान देतात. म्हणजेच महाराष्ट्राचे योगदान हे भारतीय नेमबाजी पटलावर मोठे आहे,’’ याकडे दीपाली देशपांडे यांनी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राच्या योगदानाबाबत प्रशिक्षक सुमा शिरुर म्हणाल्या की, ‘‘चक्रवर्ती, बाम यांच्या मार्गदर्शनाखाली मी, अंजली, दीपाली यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके कमवायला सुरुवात केली. ऑलिम्पिकमध्ये २०००मध्ये अंजलीने आणि २००४मध्ये मी अंतिम फेरी गाठली होती. ते पाहता महाराष्ट्राकडून खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजी झळकायला सुरुवात झाली. मात्र आता देशभरात अनेक ठिकाणी नेमबाजीच्या उत्तम सुविधा आहेत. अनेक माजी नेमबाज आता प्रशिक्षक म्हणून कामगिरी करत आहेत. २१ सुवर्णपदके जी २०१९ मध्ये मिळाली आहेत, त्यात देशभरातील नेमबाजांचे योगदान आहे. मात्र महाराष्ट्राकडून नेमबाजीचा प्रचार आणि प्रसार व्हायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली,’’ असे सुमा यांनी सांगितले.