प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि नेपाळचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याच्यावरील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे. शुक्रवारी (२९ डिसेंबर) काठमांडू जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी लामिछाने याला दोषी ठरवलं आहे. पुढच्या सुनावणीवेळी संदीपला शिक्षा सुनावली जाईल. न्यायमूर्ती शिशिर राज ढकाल यांच्या खंडपीठासमोर रविवारपासून याप्रकरणी सुनावणी चालू होती. संदीप सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. १२ जानेवारी रोजी पाटण उच्च न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली होती.

काठमांडू जिल्हा न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी संदीप लामिछाने याची सुंधरा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. जानेवारी महिन्यात तो जामीनावर बाहेर आला. पाटण उच्च न्यायालयातील ध्रुवराज नंदा आणि न्यायमूर्ती रमेश दहल यांच्या संयुक्त खंडपीठाने १२ जानेवारी रोजी संदीपची २० लाख नेपाळी रुपयांच्या जातमुचलक्यावर काही अटींसह सुटका करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून तो तुरुंगाबाहेर आहे.

काठमांडू जिल्हा अ‍ॅटॉर्नी कार्यालयाने २१ ऑगस्ट रोजी लामिछाने याच्याविरोधात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. २१ ऑगस्ट २०२२ रोजी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संदीपविरोधात गुन्हा दाखल झाला तेव्हा तो कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे गेला होता. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर संदीपचं बँक खातं सील करण्यात आलं, तसेच त्याची संपत्ती जप्त करण्यात आली.

हे ही वाचा >> IND vs SA : ‘येथे आल्यानंतर तुम्हाला…’, सुनील गावसकरांनी सांगितले भारताचे पराभवाचे महत्त्वाचे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संदीपने ५१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ५२ टी-२० सामन्यांमध्ये नेपाळचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमध्येदेखील सहभागी झाला होता. तो २०१८ ते २०२० अशी ३ वर्षे दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. या काळात त्याने ९ आयपीएल सामन्यांमध्ये १३ बळी घेतले आहेत.