एकेकाळी क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजला अनुनभवी नेपाळने टी२० सामन्यात पराभवाचा धक्का दिला. नेपाळ क्रिकेट बोर्डाच्या आग्रहाखातर वेस्ट इंडिजने या मालिकेसाठी होकार दिला. शारजात झालेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर पराभवाची वेळ ओढवली. दुसरीकडे प्रचंड चाहता वर्ग असणाऱ्या नेपाळने विजय मिळवत पाठीराख्यांना सुखद धक्का दिला. नेपाळने याआधी अफगाणिस्तान, झिम्बाब्वे यांना हरवलं आहे पण नियमित कसोटी खेळणाऱ्या देशाला हरवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.

वेस्ट इंडिजने या मालिकेसाठी नव्या दमाचा संघ पाठवला. संघाचं नेतृत्व अकेल हुसेनकडे सोपवलं. अकेलने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेपाळची सुरुवात चांगली झाली नाही पण कर्णधार रोहित पौडेलने ३८ तर कुशल मल्लाने ३० धावांची खेळी केली. या दोघांनी भागीदारी करत नेपाळच्या डावाला आकार दिला. गुलशन झा याने २२ तर दिपेंद्र सिंग अरी यांनी १७ धावांचं योगदान दिलं. या चौघांनंतर नेपाळची पुन्हा घसरगुंडी उडाली आणि त्यांनी २० षटकात १४८ धावांची मजल मारली. अनुभवी जेसन होल्डरने २० धावांत ४ विकेट्स पटकावल्या. पदार्पणवीर नवीन बिडाइसने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना अनुभवी काईल मेयर्स ५ धावा करुन तंबूत परतला. आमिर जंगू आणि अकीम ऑगस्ट यांनी डाव सावरला. नंदन यादवने अकीमला बाद केलं. पौडेलने जोएल अँड्यूला माघारी धाडलं. ललित राजबंक्षीने जंगूला बाद करत महत्त्वपूर्ण यश मिळवून दिलं. उत्तम फॉर्मात असणारा केसी कार्टी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला. ५ बाद ६८ या स्थितीतून नवीन आणि होल्डर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुश भुर्टेलने होल्डरला बाद करत वेस्ट इंडिजला अडचणीत आणलं. भुर्टेलच्या बॉलिंगवर नवीन हिट विकेट झाला. त्याने अडखळत २२ धावा केल्या. कर्णधार अकेल होसेनने षटकारासह सुरुवात केली. फॅबिअल अॅलन आणि त्याने मिळून १८व्या षटकात १९ धावा चोपून काढल्या. मात्र १९व्या षटकात करण केसीने होसेनला बाद केलं. त्याने ९ चेंडूत १८ धावा केल्या. केसीने १९व्या षटकात शिस्तबद्ध मारा करत अवघ्या २ धावा देत विकेटही पटकावली.

शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी २८ धावांची आवश्यकता होती. फॅबिअनने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरही त्याने चौकार वसूल केला. मात्र यानंतरचा चेंडू निर्धाव पडला. पाचव्या चेंडूवरही फॅबिअनला एकही धाव घेता आली नाही. सहाव्या चेंडूवर फॅबिअनने जोरकस फटका लगावला पण भुर्टेलने सीमारेषेवर अफलातून झेल टिपला आणि नेपाळच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. नेपाळने १९ धावांनी हा मुकाबला जिंकला.