Devon Conway Released From CSK: आयपीएल २०२६ स्पर्धेला येत्या काही महिन्यात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी मिनी ऑक्शन होणार आहे. सर्व १० फ्रेंचायझींना आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. ही अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी काही संघांमध्ये खेळाडूंचा ट्रेड झाला आहे. दरम्यान ५ वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्जने मिनी ऑक्शनपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा स्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉनवे रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धेपूर्वी होणाऱ्या मिनी ऑक्शनपू्र्वी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची आज (१५ नोव्हेंबर) शेवटची तारीख आहे. दरम्यान डेव्हॉन कॉनवेने स्वत: आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चेन्नई सुपर किंग्ज संघातून बाहेर पडत असल्याची माहिती दिली आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या डेव्हॉन कॉनवेने २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी पदार्पण केलं होतं. स्पर्धेतील पहिल्याच हंगामात फलंदाजी करताना त्याने ७ डावात ४२ च्या सरासरीने २५२ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२३ मध्ये त्याने ५१.६९ च्या सरासरीने ६७२ धावा केल्या होत्या.
पोस्ट शेअर करत दिली माहिती
डेव्हॉन कॉनवेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या जर्सीतील फोटो शेअर केले आहेत.
यासह त्याने गेल्या ३ वर्षांत जे प्रेम दिलं, त्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघ आणखी काही मोठे निर्णय घेऊ शकतो. चेन्नईचा संघ रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा आणि विजय शंकर यांना रिलीज करू शकतो. आगामी हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघात आणखी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे.
संघातील सर्वात अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाने आगामी हंगामापूर्वी या संघाची साथ सोडली आहे. रवींद्र जडेजा आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे.
