विम्बल्डन : सर्बियाच्या दुसऱ्या मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने अप्रतिम कामगिरी सुरू राखताना विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेची तब्बल ३५व्यांदा अंतिम फेरी गाठली असून अशी कामगिरी करणारा तो पहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे. 

शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात २३ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचने आठव्या मानांकित इटलीच्या यानेक सिन्नेरला ६-३, ६-४, ७-६ (७-४) असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. सामन्यातील पहिला व दुसरा सेट जोकोव्हिचने सहज जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये मात्र सिन्नेरने जोकोव्हिचला आव्हान दिले. हा सेट टायब्रेकरवर गेला. परंतु, जोकोव्हिचने खेळ उंचावत विजय साकारला आणि आठव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद मिळवण्याकडे कूच केली.जोकोव्हिचने यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेत जेतेपद पटकावल्यास त्याचे हे हंगामातील सलग तिसरे जेतेपद ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाबेऊर-वोंड्रोसोव्हामध्ये जेतेपदासाठी द्वंद्व आज विम्बल्डन

टय़ुनिशियाची सहावी मानांकित ओन्स जाबेऊर आणि चेक प्रजासत्ताकची मार्केटा वोंड्रोसोव्हा यांच्यात विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी रंगणार आहे. दोन्ही टेनिसपटूंचा पहिले ग्रँडस्लॅम जेतेपदाचे लक्ष्य आहे. जाबेऊरने आपल्या गेल्या सहा सामन्यांत चार ग्रँडस्लॅम विजेत्या खेळाडूंना नमवले आहे.