पीटीआय, नवी दिल्ली
प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींना मागे सारत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांचा आज, शनिवारी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आपापल्या सलामीच्या लढतीत विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आनरिख नॉर्किए आणि सिसांडा मगाला या जायबंदी वेगवान गोलंदाजांविनाच विश्वचषकात खेळावे लागणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ प्रमुख लेग-स्पिनर वानिंदू हसरंगाविनाच या स्पर्धेत खेळणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हसरंगा श्रीलंकेचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. त्याच्यासह अनुभवी वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराही या स्पर्धेत खेळू शकणार नाही. या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूंना आपली कामगिरी उंचवावी लागेल. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
हेही वाचा >>>IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिल खेळणार की नाही? राहुल द्रविडने त्याच्या प्रकृतीबाबत दिली लेटेस्ट अपडेट
दक्षिण आफ्रिका
- विश्वातील सर्वात वेगवान मारा करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या नॉर्किएच्या अनुपस्थितीत कगिसो रबाडावर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची भिस्त असेल.
- फिरकीची धुरा केशव महाराज आणि तबरेझ शम्सी सांभाळतील.
- फलंदाजीत दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी क्विंटन डिकॉक आणि कर्णधार टेम्बा बव्हुमा यांच्यावर असेल.
- मधल्या फळीतील हेन्रिक क्लासन आणि डेव्हिड मिलर हे सध्या लयीत आहेत. तसेच एडीन मार्करममध्येही आक्रमक खेळी करण्याची क्षमता आहे.
श्रीलंका
- श्रीलंकेच्या फलंदाजीची मदार कुसाल मेंडिसवर असेल. मेंडिसने गेल्या पाचपैकी तीन सामन्यांत अर्धशतक साकारले आहे.
- श्रीलंकेकडे दिमुथ करुणारत्ने, कुसाल परेरा, पथम निसंका आणि सदीरा समरविक्रमा यांसारखे प्रतिभावान फलंदाज आहेत.
- कर्णधार दसून शनाकाची गेल्या काही काळातील कामगिरी हा श्रीलंकेसाठी चिंतेचा विषय आहे. त्याने आणि चरिथ असलंकाने कामगिरी उंचावणे आवश्यक आहे.
- श्रीलंकेच्या गोलंदाजीची भिस्त महीश थीकसाना आणि युवा डावखुरा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागे यांच्यावर असेल. तसेच मथीश पथिरानाची भूमिकाही महत्त्वाची असेल.
वेळ : दु. २ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी, हॉटस्टार (मोफत)