एखाद्या पॅव्हेलियनची, झाडाची किंवा क्षेत्ररक्षकाची सावली खेळपट्टीवर पडत असेल आणि फलंदाजाने तक्रार केली तर तुम्ही काय कराल? चेंडू हेल्मेटमध्ये अडकला तर त्याला कॅच म्हणावे का? असे प्रश्न एक क्रिकेट पंच म्हणून तुम्हाला विचारल्यास तुम्ही काय उत्तर द्याल? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पंचांच्या (अंपायर) परिक्षेत वरील प्रश्नांसारखे एकूण ३७ प्रश्न विचारले होते.

अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात बीसीसीआयने पंचांच्या ‘लेव्हल-२’ परीक्षेत गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांचा समावेश केला होता. परीक्षेत विचारण्यात आलेले ३७ प्रश्न आता उघड झाले आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास ‘डी’ गटातील महिला आणि कनिष्ठ सामन्यांमध्ये पंचगिरी करण्याची संधी मिळते. मात्र, १४० इच्छुकांपैकी केवळ तीन जणांना अपेक्षित यश मिळवता आले आहे.

हेही वाचा – India Tour Of Zimbabwe: “आंघोळीसाठी कमी पाणी वापरा”; बीसीसीआयने खेळाडूंना का दिल्या सूचना?

बीसीसीआयने एकूण २०० गुणांचा पेपर घेतला होता. त्यामध्ये लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, व्हिडीओ परिक्षण आणि शारीरीक चाचणीचा समावेश होता. करोना साथीनंतर बीसीसीआयने पहिल्यांदाच पंचांसाठी शारीरिक चाचणी घेतली. २०० पैकी ९०पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची पंच म्हणून निवड केली जाणार होती.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ‘सर्वोत्तम पात्र उमेदवार निवडले जातील, यासाठी परिक्षेची काठिण्य पातळी उच्च ठेवली होती. सामन्यात पंचाची भूमिका पार पाडणे हे कठीण काम आहे. ज्यांना याची आवड आहे तेच खरोखर उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. राज्य संघटनांनी पाठवलेले उमेदवार योग्य नव्हते. जर त्यांना बोर्डासाठी काम करायचे असेल तर त्यांना खेळाचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे.’