Pakistan cricket team announce 15 member squad for Champions Trophy: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, पाकिस्तान संघाकडे या स्पर्धेचे यजमानपद आहे, ज्यामध्ये क्रमवारीवर आधारित शीर्ष ८ संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी ७ संघांनी आधीच आपले संघ जाहीर केले असताना, यजमान पाकिस्तान संघाच्या घोषणेची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अखेरीस पाकिस्तान संघाने आपल्या संघाची घोषणा केली आहे.

गतविजेत्या पाकिस्ताननेही अखेर ३१ जानेवारीला संध्याकाळी आपला संघ जाहीर केला, ज्यामध्ये एकूण ४ खेळाडू दीर्घ कालावधीनंतर संघात परतताना दिसत आहेत. यामध्ये २०१७ मध्ये भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा सलामीवीर फखर जमानही परतला आहे. क्रिकेटमधील हायव्होल्टेज सामना म्हणजेच भारत वि पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी जाहीर झालेल्या पाकिस्तानी संघात फखर जमान व्यतिरिक्त फहीम अश्रफ, खुशदिल शाह आणि सौद शकील यांच्या नावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त जेव्हा पाकिस्तान संघाने २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती तेव्हा त्या संघाचा भाग असलेले बाबर आझम, फहीम अश्रफ आणि फखर जमान यावेळीही ही स्पर्धा खेळताना दिसणार आहेत.

सैम अय्युब दुखापतीमुळे या स्पर्धेचा भाग नसणार आहे, अशा परिस्थितीत बाबर आझम किंवा सौद शकील यापैकी एक फखर जमानसह सलामीची जबाबदारी सांभाळताना दिसतील. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान संघाने आतापर्यंत तीन वनडे मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी त्यांनी ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केले, त्यानंतर त्यांनी झिम्बाब्वे विरुद्धची मालिका २-१ ने जिंकली आणि एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा ३-० ने पराभव केला.

पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मायदेशात तिरंगी मालिकाही खेळायची आहे, ज्यामध्ये त्यांच्याशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही असणार आहेत. ही मालिका ८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेला संघ या तिरंगी मालिकेत खेळताना दिसणार असल्याचे पीसीबीने स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ

बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (कर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.