एपी, रावळपिंडी
ऑफ-स्पिनर सायमन हार्मरच्या (६/५०) प्रभावी फिरकी गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात गुरुवारी पाकिस्तानवर आठ गडी राखून विजय मिळवला. यासह आफ्रिकेने दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.
पाकिस्तानने लाहोर येथे झालेला पहिला कसोटी सामना ९३ धावांनी जिंकला होता. त्यानंतर रावळपिंडी येथील दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला पहिल्या डावात वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी होती. मात्र, तळाच्या फलंदाजांमुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात आघाडी मिळवली. त्यानंतर हार्मरच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा दुसरा डाव १३८ धावांत आटोपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ६८ धावांचे माफक लक्ष्य मिळाले, जे त्यांनी १२.३ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. हार्मर आणि केशव महाराज या फिरकीपटूंनी मिळून सामन्यात १७ गडी बाद केले.
आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार एडीन मार्करमने ४५ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ४२ धावांची खेळी केली. संघाला चार धावांची आवश्यकता असताना त्याला नोमान अलीने पायचीत केले. सलामीवीर रायन रिकल्टननेही (नाबाद २५) चांगली फलंदाजी करताना आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यापूर्वी, हार्मरने नोमानला बाद करीत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १००० गडी पूर्ण केले.
त्याआधी पहिल्या डावात पाकिस्तानच्या ३३३ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची एकवेळ ८ बाद २३५ अशी स्थिती होती. मात्र, अष्टपैलू सेनुरन मुथुस्वामीने (१५५ चेंडूंत नाबाद ८९) एक बाजू लावून धरताना उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याला केशव महाराज (५३ चेंडूंत ३०) आणि कगिसो रबाडा (६१ चेंडूंत ७१) यांनी साथ लाभली. अखेरच्या दोन जोड्यांनी मिळून १६९ धावांची भर घातल्याने दक्षिण आफ्रिकेला ४०४ धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना ७१ धावांची आघाडी मिळाली. अखेरीस तीच निर्णायक ठरली.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान (पहिला डाव) : ३३३
द. आफ्रिका (पहिला डाव) : ४०४
पाकिस्तान (दुसरा डाव) : ४९.३ षटकांत सर्वबाद १३८ (बाबर आझम ५०, सलमान आघा २८; सायमन हार्मर ६/५०, केशव महाराज २/३४)
द. आफ्रिका (दुसरा डाव) : १२.३ षटकांत २ बाद ७३ (एडीन मार्करम ४२, रायन रिकल्टन नाबाद २५; नोमन अली २/४०)
