पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शहाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहासाची नोंद केली आहे. बांगलादेशविरुद्ध रावळपिंडी कसोटी सामन्यात नसीम शहाने हॅटट्रीकची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हॅटट्रीक नोंदवणारा नसीम शहा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे.

नसीमने दुसऱ्या डावात बांगलादेशच्या नजीमुल हुसेन, तैजुल इस्लाम आणि मेहमद्दुलाला माघारी धाडत हॅटट्रीकची नोंद केली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस बांगलादेशचा संघ ८६ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्याकडे अवघ्या ४ विकेट शिल्लक आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने १२६/६ पर्यंत मजर मारली होती.

पहिल्या डावात बांगलादेशने २३३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने बाबर आझम आणि शान मसुदच्या शतकी खेळाच्या जोरावर ४४५ धावांपर्यंत मजल मारत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पाकिस्तानी आक्रमणासमोर बांगलादेशचा डाव कोलमडला. त्यामुळे डावाने पराभव टाळण्यासाठी बांगलादेशला चौथ्या दिवशी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.