Sahizada Farnhan Drags Dhoni Kohli In Gunfire Celebration Controversy: सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज साहिबझादा फरहानने केलेल्या ‘गनफायर’ सेलिब्रेशनच्या वादाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. साहिबझादा फरहानने या वादात आता भारताचे माजी कर्णधार एम. एस. धोनी आणि विराट कोहली यांना ओढले आहे.
२१ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यादरम्यान, अर्धशतकानंतर साहिबझादा फरहानने आपली बॅट अशा प्रकारे धरली होती जणू तो बंदूक धरून गोळीबार करत आहे. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या सेलिब्रेशनवर आक्षेप घेतला आणि आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली. आयसीसीने याप्रकरणाची सुनावणी घेतली आहे. या सुनावणीत साहिबझादा फरहानने एम. एस. धोनी आणि विराट कोहलीचा ढाल म्हणून वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
बीसीसीआयच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी आयसीसीच्या अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली, ज्यामध्ये साहिबझादा फरहानने आपल्या बचावात जोरदार युक्तिवाद केले. इंडिया टुडेने सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, सलामीवीर फरहानने स्पष्ट केले की त्याच्या ‘गनफायर’ सेलिब्रेशनचा कोणताही राजकीय हेतू नव्हता किंवा तो कोणालाही चिथावणी देण्याचा हेतू नव्हता. ते फक्त एक सेलिब्रेशन होते. यावेळी त्याने विराट कोहली आणि एम. एस. धोनीचा उल्लेख केला.
आपला बचाव मजबूत करण्यासाठी, साहिबझादा फरहानने भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनीही यापूर्वी अशा प्रकारचे सेलिब्रेशन केल्याचा दाखला दिला. त्याने आयसीसीला सांगितले की, धोनी आणि कोहलीसारख्या प्रमुख खेळाडूंनीही भूतकाळात अशा प्रकारे सेलिब्रेशन केले आहे. त्याने असेही म्हटले की, तो पठाण आहे आणि त्यांच्या समाजात ही एक संस्कृती आहे.
साहिबझादा फरहानने स्वतःची बाजू मांडली असली तरी, अद्याप आयसीसीने यावर निर्णय दिला नाही. या प्रकरणी, असेही म्हटले जात आहे की, साहिबझादा फरहानवर अजूनही कारवाई केली जाऊ शकते.
दरम्यान, गट फेरी आणि सुपर ४ मधील सामन्यांनंतर आता २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.