पाकिस्तान क्रिकेटमधल्या अंतर्गत बंडाळ्यांचं एक नवीन उदाहरण समोर आलं आहे. पाकिस्तान सुपर लीगमधल्या मुलतान सुलतान संघाच्या मालकाने बोर्डाने पाठवलेली नोटीसच फाडून टाकली आहे. सोशल मीडियावर याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
मुलतान सुलतान हा पाकिस्तान सुपर लीगमधला संघ आहे. अली खान तरीन हे त्याचे मालक आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खान यांना नोटीस पाठवली. लीगसंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि खान यांच्यात १० वर्षांचा करार झाला आहे. या कराराच्या कलमांचा भंग झाल्याप्रकरणी बोर्डाने त्यांना नोटीस बजावली आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या संघमालकांचे करार यंदा डिसेंबरमध्ये संपत आहेत. दशकभराच्या कालावधीनंतर संघमालकांना संघाची मालकी आपल्याकडेच कायम राखायची असेल तर त्यांना पुन्हा आवेदन सादर करावं लागेल.
पाकिस्तान सुपर लीग व्यवस्थापनावर खान यांनी टीका केली होती. खान यांनी जाहीर माफी मागितली नाही तर त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल असं मुलतान सुलतान संघाने म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात खान यांनी पाकिस्तान सुपर लीगच्या आयोजनासंदर्भात अनेकदा टीका केली होती. संघमालकांशी समन्वय आणि पारदर्शकतेचा अभाव या मुद्यांवरून खान यांनी पाकिस्तान सुपर लीगच्या व्यवस्थापनाला लक्ष्य केलं होतं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गेल्या महिन्यात मुलतान सुलतानला नोटीस पाठवली. खान यांनी पीएसएलसंदर्भात केलेल्या टीकेच्या पोस्ट मागे घ्यावात आणि जाहीर माफी मागावी असं या नोटिशीत म्हटलं आहे. तसं न केल्यास फ्रँचाईज करार रद्द करण्यात येईल आणि खान यांना आयुष्यभरासाठी ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे.
‘सकारात्मक टीकेला पीसीबीने गुन्हा ठरवून टाकलं. पीसीबीची वैचारिक डबघाई यातून दिसते. पीसीबीला कोणीही प्रश्न विचारलेले आवडत नाही. त्यांना कामाप्रति उत्तरदायित्व नको आहे. ज्यांनी लीग तयार होण्यासाठी योगदान दिलं त्यांचाही विचार होत नाही. प्रांजळपणे मत मांडणाऱ्या माणसाला ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा देऊन लीग मोठी होणार नाहीये असं खान यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान क्रिकेटप्रति त्यांची निष्ठा वादातीत आहे. पाकिस्तान सुपर लीगचं भलं व्हावं यासाठी ते सातत्याने योगदान देत आहे असं मुलतान सुलतान संघाने म्हटलं आहे.
पीसीबीने ब्लॅकलिस्ट केल्यास खान मुलतान सुलतान संघाशी निगडीत आगामी प्रक्रियेत सहभागी होता येणार नाहीत. मात्र तरीही खान पीसीबीच्या संघव्यवस्थापनेला खुले आव्हान देत आहेत. खान यांनी एक्स वर व्हीडिओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणतात, ‘पीसीबीने संघमालकांशी थेट संवाद साधला नाही. उलट मला नोटीस पाठवण्यात आली. पीसीबीचं हित लक्षात घेऊन मी माफी मागेनही. व्हीडिओत पुढे ते पीसीबीने पाठवलेली नोटीस फाडताना दिसतात. तुम्हाला माझा माफीचा व्हीडिओ आवडेल अशी आशा करतो’ असं ते म्हणतात.’
