पीटीआय, नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) विजेता कर्णधार हार्दिक पंडय़ाकडे बुधवारी आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. महाराष्ट्राचा फलंदाज राहुल त्रिपाठीला प्रथमच संधी मिळाली आहे, तर यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे.

डब्लिन येथे २६ आणि २८ जूनला होणाऱ्या आयर्लंडविरुद्ध दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ‘आयपीएल’मध्ये सनरायजर्स हैदरबादकडून चारशेहून अधिक धावा काढणारा त्रिपाठी हा एकमेव नवा चेहरा या संघात आहे. याचप्रमाणे राजस्थान रॉयल्सला अंतिम फेरीपर्यंत नेणारा कर्णधार सॅमसनलाही कारकीर्द सावरण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. भुवनेश्वर कुमार हा संघाचा उपकर्णधार आहे.

ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी भारतीय कसोटी संघात सामील होणार आहे. त्यामुळे पंडय़ाकडे कर्णधारपद सोपवले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या संघात फक्त दिनेश कार्तिकच्या नावापुढे यष्टीरक्षक असा उल्लेख केला आहे; परंतु इशान किशन आणि सॅमसन यांच्याकडेही यष्टीरक्षणाची क्षमता आहे.

भारतीय संघ

हार्दिक पंडय़ा (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

राहुल इंग्लंडविरुद्ध मालिकेला मुकणार?

अनुभवी सलामीवीर केएल राहुल पुढील महिन्यात बर्मिगहॅम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घ्यावी लागलेला राहुल अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याची माहिती मिळत आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघ एकमेव २०२१ मधील प्रलंबित कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे निवड समिती राहुलच्या जागी बदली खेळाडूचा विचार करीत नाही. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा हे सलामीसाठी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे १७ खेळाडूंपैकी एक खेळाडू जाऊ शकला नाही, तरी फारशी समस्या उद्भवणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.