इंडिया ओपन जागतिक मानांकन स्नूकर स्पर्धा यंदा मुंबईत होणार आहे. घरच्या मैदानावर संभाव्य विजेता म्हणून पंकज अडवाणीचे नाव चर्चेत आहे. मात्र या स्पर्धेनंतर लगेचच जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा होणार असल्याने पंकज अडवाणीच्या सहभागाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवत भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या क्रीडापटूंमध्ये पंकजचा समावेश होतो. नियमांत फरक असलेले स्नूकर आणि बिलियर्ड्स हे दोन्ही खेळ तो खेळतो. मात्र दोन्ही खेळांच्या स्पर्धा एकाचवेळी होत असल्याने पंकजसाठी अडचणीसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.
‘‘दोन वर्षांपूर्वी मी इंग्लंडमध्ये स्नूकर खेळत होतो. मात्र त्यानंतर मी बिलियर्ड्स खेळण्याचा निर्णय घेतला. देशासाठी पदके जिंकण्याचा आनंद अनोखा आहे. तो मी सध्या अनुभवतो आहे. मात्र दोन्ही खेळ आणि त्यांच्या स्पर्धांचे वेळापत्रक सांभाळताना तारांबळ उडते,’’ असे पंकजने सांगितले.
बिलियर्ड्स प्रीमिअर लीग उपयुक्त ठरेल
‘‘आयपीएलच्या धर्तीवर अन्य खेळांतही लीग स्पर्धा सुरू झाल्या आहेत. बिलियर्ड्समध्येही अशी स्पर्धा सुरू झाली तर खेळाच्या विकासासाठी ते उपयुक्त असेल. अशा स्वरुपाच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र बिलियर्ड्स आणि स्नूकरने राबवलेली संकल्पेना राष्ट्रीय स्तरासाठीही अंमलात आणली जाऊ शकते. दोन खेळांच्या स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यापेक्षा स्नूकर आणि बिलिअर्ड्चे मिश्रण असलेली स्पर्धा फायदेशीर ठरेल,’’ असे अडवाणीने सांगितले.
इंडिया ओपन जागतिक मानांकन बिलियर्ड्स स्पर्धा मुंबईत
१३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत इंडिया ओपन जागतिक मानांकन बिलियर्ड्स स्पर्धा मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठीची पात्रता फेरी इंग्लंडमधील बार्न्सले येथे होणार असून, मुख्य स्पर्धेत ६४ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. स्थानिक खेळाडूंना सहा वाइल्ड कार्ड देण्यात येणार आहेत. त्यासाठी चेन्नई, इंदूर, दिल्ली आणि पुणे किंवा मुंबई या शहरात पात्रता फेरीची स्पर्धा होईल.