पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच स्तरावर कोंडी करायला सुरुवात केली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेतही भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी जोर धरायला लागल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन पावलं मागे येत चर्चेची तयारी दाखवली आहे. आयसीसीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी दुबईत पार पडणाऱ्या बैठकीत दोन्ही बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. Times Now या संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

2008 नंतर उभय देशांत क्रिकेट मालिका झालेली नाही. मात्र, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाक सामने झाले आहेत. 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आणि 2018 च्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक यांच्यात सामने झाले होते. 27 फेब्रुवारी ते 2 मार्चदरम्यान दुबईत आयसीसीची बैठक पार पडणार आहे. या दरम्यान भारत-पाक सामन्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करु असं आश्वासन आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी म्हटलं आहे.

अवश्य वाचा – Pulwama Terror Attack : पाक पंतप्रधानांनी दिलेल्या धमकीवर आफ्रिदी म्हणतो….एकदम योग्य केलत !

क्रिकेट आणि राजकारण यांची सरमीसळ करू नये, असे पीसीबीनं आधीच स्पष्ट केलं होतं. पण, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेत पाकविरुद्धच्या सामन्यात बहिष्कार टाकण्याची शक्यता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पीसीबी दुबईत बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचे समजतं आहे.