कोलकाता : भारतात होणाऱ्या प्रकाशझोतातील पहिल्या कसोटी सामन्यात फक्त गुलाबी चेंडूचेच प्रमुख आव्हान असेल; परंतु भारताच्या भक्कम फलंदाजीच्या फळीला त्याच्याशी जुळवून घेण्यात कोणतीही समस्या येणार नाही, असे मत चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे. तीन वर्षांपूर्वी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील तांत्रिक समितीने सुचवल्यामुळे दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत प्रायोगिक स्तरावर गुलाबी चेंडू वापरण्यात आला होता. त्या वेळी इंडिया ब्ल्यूकडून खेळताना चेतेश्वरने दोन शतकांसह स्पर्धेत सर्वाधिक ४५३ धावा केल्या होत्या. यात नाबाद २५६ धावांच्या खेळीचाही समावेश होता. ‘‘प्रकाशझोतामधील सामने अधिकाधिक खेळल्यानंतर गुलाबी चेंडूसह खेळण्याचा उत्तम सराव होईल. याशिवाय काही वेगळेपण या सामन्यात असेल, असे मला वाटत नाही; परंतु सामन्याच्या अनुभवातून शिकत जाऊ,’’ असे पुजाराने सांगितले.