जे काही घडले ते अविश्वसनीय असेच होते.. पोर्तुगाल पराभूत होऊन गाशा गुंडाळणार ही काळ्या दगडावरची रेघ होती.. परंतु सिल्व्हेस्टर वरेलाला हे नामंजूर होते.. अतिरिक्त वेळेत ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या क्रॉसवर वरेलाने लाजवाब हेडरद्वारे गोल साकारला आणि पोर्तुगाल संघाला या नामुष्कीपासून वाचवले.. या महत्त्वाच्या गोलमुळे पोर्तुगालने अमेरिकेला २-२ असे बरोबरीत रोखले.
नानीने पाचव्याच मिनिटाला गोल करीत पोर्तुगाल संघाला पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. परंतु दुसऱ्या सत्रात जर्मेनी जोन्स आणि क्लिंट डेम्पसे यांच्या गोलमुळे आघाडी अमेरिकेकडे आली. डेम्पसेचा हा विश्वचषकातील चौथा गोल ठरला. पोर्तुगाल हा सामना हरणार अशी चिन्हे दिसत असताना अतिरिक्त वेळेतील काही सेकंद बाकी असताना वरेलाच्या गोलमुळे पोर्तुगालला जीवदान मिळाले. सलामीच्या सामन्यात जर्मनीने पोर्तुगालचा ४-० असा धुव्वा उडवला होता.
शनिवारी लिओनेल मेस्सीने अतिरिक्त वेळेत अद्वितीय गोल साकारून अर्जेटिनाला जिंकून दिले होते. रोनाल्डोने त्याच दर्जाचा प्रयत्न करून दिलेल्या क्रॉसवर वरेलाने गोल केला आणि साऱ्या अमेरिकन फुटबॉलरसिकांच्या काळजाचा ठोका चुकला.
मागील विश्वचषक स्पध्रेतसुद्धा दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या अमेरिकेने पहिल्या सामन्यात घानाला हरवले होते. त्यामुळे अमेरिका आणि जर्मनी यांच्या खात्यावर प्रत्येकी चार गुण जमा आहेत. आता त्यांचा अखेरचा साखळी सामना जर्मनीविरुद्ध आहे. तसेच प्रत्येकी एक गुण खात्यावर असलेले घाना आणि पोर्तुगाल हे दोन्ही संघ गुरुवारी एकमेकांशी भिडणार आहेत.
पोर्तुगाल संघाला या सामन्यातसुद्धा दुखापतींच्या चिंतेला सामोरे जावे लागले. जर्मनीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ह्युगो अल्मेडाला दुखापत झाल्यामुळे अनुभवी आक्रमणवीर हेल्डर पोस्टिगा त्याची भूमिका बजावणार होता. परंतु फक्त १६व्या मिनिटाला पोस्टिगाला मैदान सोडावे लागले आणि एल्डरला बदली खेळाडू म्हणून मैदानावर यावे लागले. वातावरणामुळे रेफरीने दोन्ही संघांना पाच मिनिटांची विश्रांतीसुद्धा दिली. या काळात जर्मेनी जोन्सवर उपचारसुद्धा घेण्यात आले.