ताश्कंद : ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने ताश्कंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या ‘उझचेस’ चषक मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावताना ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये भारताचा अव्वल बुद्धिबळपटू होण्याचा मानही मिळवला. त्याने जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशला मागे टाकले.
‘उझचेस’ स्पर्धेत अखेरच्या फेरीनंतर प्रज्ञानंद, तसेच घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणारे नोदिरबेक अब्दुसत्तोरोव आणि जावोखिर सिंदारोव यांचे समान ५.५ गुण होते. बरोबरीची ही कोंडी फोडण्यासाठी अतिजलद प्रकारातील टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यातही तिन्ही खेळाडू समान दोन गुणांवर होते. मात्र, अखेरच्या फेरीत १९ वर्षीय प्रज्ञानंदने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना अब्दुसत्तोरोवला नमवत जेतेपदावर मोहोर उमटवली.
‘उझचेस’ स्पर्धेतील यशासह प्रज्ञानंदने ‘लाइव्ह रेटिंग’मध्येही मोठी झेप घेतली. तो एलो २७७८.३ गुणांसह चौथ्या स्थानी पोहोचला आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. गुकेशची एलो २७७६.६ गुणांसह पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये प्रज्ञानंद प्रथमच भारताचा अव्वल बुद्धिबळपटू ठरला आहे.
केवळ मॅग्नस कार्लसन (२८३९.२ गुण), हिकारू नाकामुरा (२८०७) आणि फॅबियानो कारुआना (२७८४.२) हे तिघे त्याच्याहून वरच्या क्रमांकावर आहेत.३ प्रज्ञानंदने ‘उझचेस’ चषक मास्टर्स स्पर्धा जिंकताना वर्षातील तिसऱ्या जेतेपदाची नोंद केली. याआधी त्याने टाटा स्टील आणि ग्रँडचेस टूर सुपरबेट क्लासिक या स्पर्धा जिंकल्या होत्या. याच महिन्यात स्टेपन अवाग्यान स्मृती स्पर्धेत त्याने उपविजेतेपद मिळवले होते.