विनायक मोहनरंगन

दिल्लीतल्या टळटळीत उन्हाच्या दुपारी आयसीसी वूमन्स वर्ल्डकप सुरू होण्याच्या काही दिवस आधी आम्ही प्रतिका रावळचे वडील प्रदीप रावळ यांना भेटलो. त्यांना यायला थोडासा उशीर झाला. त्यांना येतानाच उशीर का झाला त्याचं कारण सांगितलं.

त्यांनी मोबाईल फोन काढला आणि आम्हाला काही बॅनर दाखवले. घराजवळच्या प्रिंटरकडे ते गेले होते. वर्ल्डकप सुरू असताना काही बॅनर लावायचे होते. त्यापैकी एक होता- १००* प्रतिका रावळ- बापासाठी अभिमानास्पद क्षण

गुरुवारी नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये प्रतिकाने कारकिर्दीतलं दुसरं आणि वर्ल्डकपमधलं पहिलंवहिलं शतक झळकावलं. भारताने या स्पर्धेत चांगली सुरुवात केली मात्र त्यानंतर तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. तसंच काहीसं प्रतिकाचंही झालं. सेमी फायनल प्रवेशासाठी करो या मरोच्या लढतीत प्रतिकाने १३४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १२२ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. प्रतिकाने तिची आदर्श स्मृती मान्धनाच्या बरोबरीने २१२ धावांची खणखणीत सलामी दिली. भारतीय संघाने ३४० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने २७१ धावा केल्या. भारताने ५३ धावांनी सामना जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

या खेळीदरम्यान वनडे प्रकारात सगळ्यात जलद म्हणजे अवघ्या २३ डावात १००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम प्रतिकाने आपल्या नावावर केला. या अनोख्या विक्रमासाठीही एक बॅनर तयार करण्यात आला आहे.

दिल्लीतल्या वेस्ट पटेल नगरमधल्या घरी आल्यानंतर प्रदीप गच्चीतल्या झाडांना नियमितपणे पाणी घालतात. त्यांना गच्चीचा दरवाजा उघडताच विविध झाडं, पानं वेली समोर येतात आणि त्याचवेळी हिरव्या रंगाचं नेट्सही दिसतं. याच नेट्समध्ये प्रतिकाने कोरोना काळात सराव केला होता. कोरोनामुळे तिची उमेदीची दोन वर्ष घरातच गेली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर यायला तिला वेळ लागला असं प्रदीप सांगतात.

‘हे आमचंच घर आहे पण कोरोना काळात कोणीच इथे राहत नव्हतं. त्यामुळे मी गच्ची साफ केली आणि नेट्स तयार केलं. कोरोना काळात दररोज सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास तिला घेऊन मी सरावाला यायचो. जोपर्यंत सराव करत नाही तोवर ती जेवायची नाही किंवा झोपायचीही नाही. मीही तरुण वयात खेळायचो, मी बॉलिंग करायचो. त्यामुळे प्रतिका सराव करत असताना थ्रोडाऊनचं काम मी करतो. ती दिवसाला ४००-५०० चेंडूंचा सामना करायची’, असं प्रदीप सांगतात.

‘तिच्यासाठी तो खडतर काळ होता. कारण तिने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या होत्या. वय तिच्या हातातून निसटून जात होतं याची आम्हाला काळजी होती. क्रीडापटूंची कारकीर्द अतिशय मर्यादित असते. ती बारा वर्षांची आहे तेव्हापासून U19 गटातून खेळते आहे. बोर्डाच्या परीक्षेमुळे तिने एक वर्ष क्रिकेट सोडलं, अन्यथा ती सातत्याने क्रिकेट खेळतेच आहे. पण ही वर्ष जातील आणि संधी मिळेल अशी तिला खात्री होती, ती आम्हाला हेच सांगायची. तिने कधीही हार मानली नाही’.

न्यूझीलंडविरुद्धच्या शतकी खेळीदरम्यान हाच निर्धार पाहायला मिळाला. वर्ल्डकपमध्ये प्रतिका धावा करते आहे परंतु मोठी खेळी साकारण्यात तिला अपयश येत होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने ७५ धावांची खेळी केली मात्र तिचा स्ट्राईक रेट कमी असल्याने टीका झाली. गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी प्रतिकाच्या खेळाबाबत विश्वास व्यक्त केला होता. त्यांचा विश्वास प्रतिकाने सार्थ ठरवत शानदार शतकी खेळी साकारली.

प्रतिकाच्या क्रिकेटची सुरुवात रोहतक रोड जिमखाना इथे श्रावण कुमार यांच्या मार्गदर्शनात झाली. श्रावण यांच्या हाताखालीच इशांत शर्मा, हर्षित राणा हे भारतीय संघासाठी खेळणारे गोलंदाज घडले आहेत.

‘माझ्या अकादमीत क्रिकेट शिकणारी ती पहिलीच मुलगी होती. तिच्यातली प्रतिभा लगेचच कळते. तिच्या वयापेक्षा जास्त वयाच्या मुलांबरोबर खेळायला ती तयार असे. एकाग्रचित्ताने बॅटिंग करत असे. तिच्या खेळात निर्धार दिसायचा. तिच्याकडे उत्तम तंत्र आहे. ती माझ्या अकादमीत येऊ लागल्यावर, आणखी मुलीही येऊ लागल्या. आता माझ्या अकादमीत तीसपेक्षा जास्त मुली खेळतात, सराव करतात’.

‘प्रतिकाला क्रीडापटूच व्हायचं होतं. तिच्या वडिलांचाही तीच इच्छा होती. मी विद्यापीठात शिकत होतो तोपर्यंत क्रिकेट खेळायचो. मी मीडियम पेस बॉलर आणि फटकेबाजी करणारा बॅट्समन होतो. पण मला त्यावेळी योग्य मार्गदर्शन मिळू शकलं नाही. माझं स्वप्न लेकीने पूर्ण करावं असं वाटलं. प्रतिका ३ वर्षांची होती तेव्हाच मी तिला बॅट कशी पकडायची ते शिकवलं. मी बीसीसीआयचा लेव्हल१ अंपायर आहे. प्रतिका माझ्या बरोबर यायची आणि सामने पाहायची. तिला बास्केटबॉलही आवडायचं. बास्केटबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर तिने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. १२-१३ वर्षांची असताना तिने बास्केटबॉलऐवजी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला’, असं प्रदीप सांगतात.

प्रतिका जीनिअस आहे असं तिचा भाऊ शाश्वतला वाटतं. ‘तिने दहावी आणि बारावीत ९० पेक्षा जास्त टक्के मिळवले. मानसशास्त्र विषयात तिने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. खेळ आणि अभ्यास यांची सांगड घालण्यासाठी तिने अपार मेहनत घेतली आहे. तिला बास्केटबॉल खेळताना पाहून मी बास्केटबॉल खेळू लागलो. ती क्रिकेटकडे वळली. शाळेत ती सगळे खेळ खेळायची. ती अतिशय मेहनती आहे’. २१ वर्षीय शाश्वत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे. ‘आम्ही सगळे कुठे बाहेर जायचं ठरलं तरी तिने कधीही सरावातून सुट्टी घेतली नाही. बरं नसेल किंवा दुखापत झाली असेल तरी ती सराव करायचीच’, असं शाश्वत सांगतो.

प्रतिका लहानपणी मस्तीखोर होती असं तिची आई रजनी रावळ सांगतात. ‘खूप दंगा करायची, तिच्यापाठी घरभर धावावं लागत असे. दीप्ती धयानी मॅडमच्या मार्गदर्शनात २०१७ पासून खेळू लागल्यापासून तिच्या बॅटिंगमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. तिने तिच्या फिटनेवर खूप मेहनत घेतली आहे’.

‘अथक सरावाचं फळ तिला मिळतं आहे कारण डोमेस्टिक स्पर्धेपूर्वीही ती कसून सराव करते’, असं प्रदीप सांगतात.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारतातच होणाऱ्या मालिकेसाठी प्रतिकाची भारतीय संघात निवड झाली तेव्हा ती २४ वर्षांची होती. धडाकेबाज फलंदाज शफाली वर्माऐवजी प्रतिकाचा संघात समावेश करण्यात आला. बऱ्याच उशिराने तिला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली अशी घरच्यांची भावना होती.

‘तिला भारताकडून खेळायला बऱ्यापैकी उशिराने संधी मिळाली पण मिळाली हे महत्त्वाचं आहे. देर आए दुरुस्त आए म्हणतात तसंच आहे. आम्हाला नेहमी वाटायचं की तिने भारतासाठी खेळावं. आम्ही एका मित्राच्या लग्नासाठी रांचीला गेलो होतो. त्यावेळी तिने मला ही बातमी दिली. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले’, असं प्रदीप सांगतात.

‘वनडे पदार्पण केल्यापासून प्रतिकाने तिची आदर्श स्मृती मन्धानाबरोबर दमदार भागीदाऱ्या साकारल्या आहेत. स्मृती ही तिची अत्यंत आवडती आहे. स्मृतीनेच तिला वनडे कॅप दिली. तिच्यासाठी तो भावुक करणारा क्षण होता. स्मृतीच्या बरोबरीने ती सलामीला येते आहे. हा तिच्यासाठी, आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. स्मृती असल्यामुळे प्रतिकावर दडपण येत नाही. तिच्याकडून तिला खूप शिकायला मिळतं. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीनंतर स्मृतीला शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यावेळी तिलाही धक्का बसला. हा पुरस्कार प्रतिकाच्या बरोबरीने घेऊ इच्छिते असं स्मृतीने सांगितलं’.

‘आम्ही दोघी साधारण एकाच पद्धतीने विचार करतो. खेळत असताना आम्ही एकमेकींशी फार बोलत नाही. प्रतिका सूत्रधाराच्या भूमिकेत असते आणि मला माझ्या शैलीप्रमाणे खेळू देते. जेव्हा तिला सूर गवसतो तेव्हा मी सूत्रं सांभाळते’, असं स्मृतीने सांगितलं.

खेळाप्रति निष्ठा आणि मेहनतीमुळेच प्रतिकाने अल्पावधीतच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिला खेळात आणखी काही सुधारणा करणं आवश्यक आहे. पदार्पण केल्यापासून वर्षभरात तिने धावांची टांकसाळ उघडली आहे. भारताचं भविष्य उज्वल आहे याची खात्री तिच्या खेळाने दिली आहे.