पीटीआय, नागपूर : ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तीन फिरकी गोलंदाज खेळवण्याची संघ व्यवस्थापनाची तयारी असली, तरी नागपूरच्या खेळपट्टीबाबत  अंदाज बांधणे अवघड असल्याचे मत भारताचा उपकर्णधार केएल राहुलने व्यक्त केले.

सामनापूर्व सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत उत्तर देताना राहुलने खेळपट्टीवर खेळतो त्यापेक्षा अधिक बचावात्मक पवित्रा घेतला होता. बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी होणाऱ्या या कसोटी मालिकेला अवघे दोन दिवस असताना राहुलने यष्टिरक्षक, तिसरा फिरकी गोलंदाज आणि फलंदाजीची क्रमवारी अशा अनेक प्रश्नांवर सावध उत्तरे दिली. शुभमन गिलच्या स्थानाविषयीदेखील त्याने भाष्य केले नाही. ‘‘गिल किंवा अन्य फलंदाज कुठल्या क्रमांकावर खेळणार हा निर्णय घेणे कठीण आहे. अंतिम संघ कसा असावा याविषयी अजून विचार झालेला नाही. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या नावाची चर्चा नक्की सुरू आहे,’’ असे तो म्हणाला.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानाची खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीस पोषक राहणार अशा अंदाजाची चर्चा असली, तरी राहुलला तसे वाटत नाही. राहुल म्हणाला, ‘‘जेव्हा २२ यार्डाच्या खेळपट्टीचा अभ्यास करण्याची वेळ येते, तेव्हा ती नेहमीच भयानक वाटत असते. सामन्याला अजून दोन दिवस आहेत आणि आतापासूनच ती कशी खेळेल याविषयी भाष्य करणे योग्य नाही. सामन्याच्या दिवशी सकाळी दिसणारी खेळपट्टी ही अंतिम असेल. मी इतकी वर्षे खेळलो असलो तरी आणि निवृत्तीनंतरही छातीठोकपणे खेळपट्टी अशीच खेळेल असे खात्रीने कुणीच सांगू शकत नाही; पण एक नक्की, की येथे तीन फिरकी गोलंदाजांसह खेळण्याची आमची तयारी आहे,’’ असे राहुल म्हणाला.

राहुलने मधल्या फळीतला फलंदाज म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. ‘‘संघाची तीच गरज असेल, तर आपली मधल्या फळीत खेळण्याची तयारी आहे. संघात कोण खेळणार आणि कोण नाही याबाबत व्यवस्थापनाची एक ठोस भूमिका असते. संघातील वातावरण चांगले आहे. प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी माहीत आहे,’’ असेही राहुलने सांगितले.

 ‘‘अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचे आव्हान आहे. सध्या तरी हाच खेळाडू खेळणार असा थेट पर्याय उपलब्ध नाही. संघातील प्रत्येक खेळाडू हा गुणवत्ता दाखवल्यामुळेच येथे आला आहे. त्यामुळे जो सर्वोत्तम असेल, त्याला घेऊन अंतिम अकराची निवड करण्यात येईल,’’असेही राहुल म्हणाला.

रिव्हर्स स्विंग या खेळपट्टीवर मोठी भूमिका बजावू शकेल. रिव्हर्स स्विंगचा फायदा घेणारे गोलंदाज अशा खेळपट्टय़ांवर धोकादायक ठरतात. ऑस्ट्रेलिया संघात डाव्या हाताने फलंदाजी करणारे अनेक फलंदाज आहेत. याचा फायदा आम्हाला निश्चित होईल. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– राहुल द्रविड, भारतीय संघाचे प्रशिक्षक