क्रिकेटनंतर भारतात सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा थरार ५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. प्रो-कबड्डीचे आयोजक मार्शल स्पोर्ट्स यांनी काल सहाव्या हंगामाच्या तारखांची घोषणा केली आहे. यंदाच्या वर्षातही चाहत्यांना सलग ३ महिने कबड्डीचा आनंद घेता येणार असून, ५ जानेवारी २०१९ रोजी सहाव्या हंगामाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

पाचव्या हंगामामध्ये प्रो-कबड्डीतील सहभागी संघांची संख्या ८ वरुन १२ वर करण्यात आली. यंदाच्या हंगामातही १२ संघ सहभागी होणार आहेत. पटणा पायरेट्स संघाने गेल्या ३ हंगामाचं विजेतेपद पटकावतं हॅटट्रिक साजरी केली आहे. सहाव्या हंगामासाठी झालेल्या लिलावात तब्बल ६ खेळाडूंवर १ कोटी आणि त्यापेक्षा जास्त रुपयांची बोली लागली आहे. फजल अत्राचली, नितीन तोमर, दिपक निवास हुडा, राहुल चौधरी, रिशांक देवाडीगा आणि मोनू गोयत हे खेळाडू कोट्याधीश झाले. यांमध्ये मोनू गोयतने १ कोटी ५१ लाखांच्या बोलीसह सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान पटकावला. त्यामुळे यंदाच्या हंगामाचं विजेतेपद कोण पटकावतं याकडे सर्व कबड्डीप्रेमींचं लक्ष असणार आहे.