आयपीएल २०२१मध्ये आज पंजाब किंग्जचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी, मोदी स्टेडियमवर कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला या मैदानावर भारत आणि इंग्लंडमध्ये दोन कसोटी आणि पाच टी-२० सामने खेळले गेले होते.
चेन्नई आणि मुंबईतील सामन्यानंतर आयपीएलचे आगामी सामने दिल्ली आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. गुणतालिकेत पहिल्या ४ स्थानांबाहेर असणाऱ्या दोन संघांमध्ये मोदी स्टेडियमवर पहिला सामना रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफरने मोठी चिंता व्यक्त केली आहे.
जाफरने नरेंद्र मोदी स्टेडियमवरील केएल राहुलच्या कामगिरीबद्दल एक मीम ट्विट करत चिंता व्यक्त केली आहे. जाफर ट्विटच्या कॅप्शनमध्ये म्हणाला, ”आज पुन्हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळत आहे.” मीममध्ये हेरा फेरी चित्रपटातील ”मुझे तो ऐसे धक-धक होरेला है” हा संवाद वापरण्यात आला आहे.
Rahul playing again in Narendra Modi stadium tonight #IPL2021 pic.twitter.com/ic1sqIlA7R
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 26, 2021
जाफरने हे ट्विट करण्याचे कारण म्हणजे, मोदी स्टेडियमवर मैदानावर राहुलची कामगिरी चांगली झालेली नाही. केएल राहुलने येथे इंग्लंडविरुद्ध 4 टी 20 सामने खेळले. त्यामध्ये त्याने एकूण 15 धावा केल्या, ज्यामध्ये तो दोनदा शून्यावर बाद झाला.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण २७ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी कोलकाताने १८ तर, पंजाब किंग्जने केवळ ९ सामने जिंकले आहेत.
संभाव्य प्लेईंग XI
कोलकाता – शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, ईऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी आणि प्रसिध कृष्णा.
पंजाब – केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुडा, मोझेस हेनरिक्स, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.