क्वालालम्पूर : भारताच्या पी. व्ही. सिंधूचे मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले, परंतु किदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

पाचव्या मानांकित सिंधूने पहिल्या गेममध्ये १३-१० अशी आश्वासक आघाडी घेतली होती. परंतु जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत १०व्या स्थानावर असलेल्या कोरियाच्या संग जि ह्य़ूनने तिचा २१-१८, २१-७ असा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूने सलग तिसऱ्या सामन्यात संग हिच्याकडून पराभव पत्करला. ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत याआधी संगने तिला हरवले होते.

सिंधूने काही लक्षवेधी रॅलिजच्या बळावर प्रारंभी ८-५ अशी आघाडी मिळवली. मग क्रॉस कोर्ट स्मॅशच्या बळावर संगने बरोबरी साधली. मग सिंधूने पुन्हा ११-९ अशी आघाडी मिळवली. संगने पुन्हा मुसंडी मारताना १६-१४ अशी आघाडी घेतली. मग ही आघाडी १९-१६ अशी वाढवताना पहिला गेम तिने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये संगने ५-० अशी दिमाखदार सुरुवात केली. मग ११-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुढील ११ पैकी १० गुण तिने मिळवले आणि सामनासुद्धा जिंकला.

गेल्या आठवडय़ात इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या आठव्या मानांकित श्रीकांतने थायलंडच्या खोसित फेटप्रदाबचा २१-११, २१-१५ असा अर्ध्या तासात पराभव केला. पुढील फेरीत त्याची ऑलिम्पिक विजेत्या आणि चौथ्या मानांकित चीनच्या चेन लाँगशी गाठ पडणार आहे. २६ वर्षीय श्रीकांत या एकमेव भारतीय खेळाडूचे स्पर्धेतील आव्हान टिकून आहे.

श्रीकांतने सुरुवात चांगली करताना ६-२ अशी आघाडी मिळवली, मग १४-६ अशी वर्चस्वपूर्ण आगेकूच करताना पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येसुद्धा श्रीकांतने आपले नियंत्रण टिकवताना सामनाही खिशात घातला.

मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांचे आव्हान संपुष्टात आले. मलेशियाच्या टॅन कियान मेंग आणि लाय पेई जिंग जोडीने त्यांचा १५-२१, २१-१७, २१-१३ असा पराभव केला.