सध्या सुरू असलेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी २० क्रिकेट मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी रात्री दोन सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी संघाची घोषणा केली. इंग्लंडविरुद्ध १ जुलै रोजी होणाऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त असल्याने वरिष्ठ खेळाडू आयर्लंड दौऱ्यात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे टी २० संघात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. या खेळाडूंमध्ये राहुल त्रिपाठीचेही नाव आहे. प्रदीर्घ काळ प्रतिक्षा केल्यानंतर राहुलला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

आयर्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद तर भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या दोघांच्या नेतृत्त्वाखाली राहुल त्रिपाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्रिपाठीने नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२२ या स्पर्धेतील १४ सामन्यांमध्ये ३७.५५ च्या सरासरीने आणि १५८.२४ च्या स्ट्राइक रेटने ४१३ धावा केल्या होत्या. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. निवडसमीतीच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले होते. आता मात्र, त्याला भारतीय संघात बोलवण्यात आले आहे.

भारतीय संघात निवड झाल्यानंतर राहुलने आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय, काही माजी भारतीय खेळाडूंनीदेखील त्याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. हरभजन सिंग, इरफान पठाण आणि पार्थिव पटेल यांनी राहुल त्रिपाठीला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयर्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ – हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सुर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक</p>