मुंबई : हिमांशु सिंहच्या (२६ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने रविवारी रणजी करंडक एलिट विभागाच्या ‘ड’ गटाच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ४४६ धावा करण्यासह हिमाचल प्रदेशची अवस्था दिवसअखेर ७ बाद ९४ अशी बिकट केली. खेळ संपला तेव्हा निखिल गंगटा (नाबाद २७) व विपिन शर्मा (०) मैदानावर होते. हिमाचल प्रदेशचा संघ अजूनही मुंबईच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या ३५२ धावांनी पिछाडीवर आहे. त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्कीही ओढवू शकते.
दिवसाच्या सुरुवातीला मुंबईने ५ बाद २८९ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. मुंबईने मुशीर खान (११२) व सिद्धेश लाड (१२७) यांच्या शतकाशिवाय अष्टपैलू शम्स मुलानीच्या (६९) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ४४६ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर पहिल्या डावात उतरलेल्या हिमाचल प्रदेश संघाची सुरुवात चांगली झाली नाही. तुषार देशपांडेने (२/२१) कर्णधार अंकुश बैंस (१) व अंकित कल्सी (८) यांना बाद केले. यानंतर मुंबईचा कर्णधार शार्दूल ठाकूरने सिद्धांत पुरोहितला (१) पायचीत केले. ऑफ स्पिनर हिमांशुने यानंतर फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर पुखराज मान (३४), एकांत सेन (१५) आणि मयंक डागर (५) यांनी बाद करीत हिमाचल प्रदेशची अवस्था बिकट केली.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : १३७.२ षटकांत सर्वबाद ४४६ (सिद्धेश लाड १२७, मुशीर खान ११२, शम्स मुलानी ६९; मयांक डागर ४/१११)
हिमाचल प्रदेश (पहिला डाव) : ३७ षटकांत ७ बाद ९४ (पुखराज मान ३४, निखिल गांगटा खेळत आहे २७; हिमांशु सिंह ३/२६, तुषार देशपांडे २/२१).
