मुंबई पहिल्या डावात २३० धावांत गारद; सौराष्ट्र दिवसअखेर दुसऱ्या डावात ६ बाद १२०

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड झालेल्या सूर्यकुमार यादवने रणजी करंडकात चमकदार कामगिरी सुरू ठेवली. परंतु सूर्यकुमार (१०७ चेंडूंत ९५ धावा) आणि सर्फराज खान (१२१ चेंडूंत ७५) यांच्या झुंजार खेळींनंतरही सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात मुंबईला पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात अपयश आले.

सौराष्ट्रच्या २८९ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईचा पहिला डाव २३० धावांत आटोपला. त्यामुळे मुंबईचा संघ ५९ धावांनी पिछाडीवर पडला. मात्र, मुंबईच्या शम्स मुलानी (४/५०) आणि तुषार देशपांडे (२/३३) या गोलंदाजांनी प्रभावी मारा करताना सौराष्ट्रला दुसऱ्या डावात अडचणीत टाकले. सौराष्ट्रची दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ६ बाद १२० अशी स्थिती होती. त्यांच्याकडे १७९ धावांची आघाडी होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या दिवशी २ बाद ३६ धावांवरून पुढे खेळणाऱ्या मुंबईसाठी सूर्यकुमारने चांगली फलंदाजी केली. त्याने आधी अजिंक्य रहाणेसोबत (२४) तिसऱ्या गडय़ासाठी ६१ धावांची, तर सर्फराज खानसोबत चौथ्या गडय़ासाठी ९२ धावांची भागीदारी रचली. मात्र, सूर्यकुमारचे शतक हुकले. त्याला ९५ धावांवर फिरकीपटू युवराजसिंग डोडियाने बाद केले. सूर्यकुमारच्या खेळीत १४ चौकार व एका षटकाराचा समावेश होता. तो बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. मुंबईने अखेरचे सहा गडी २४ धावांतच गमावले. त्यानंतर डावखुरा फिरकीपटू मुलानी आणि वेगवान गोलंदाज देशपांडे यांनी सौराष्ट्रच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. सौराष्ट्रची ६ बाद ७७ अशी स्थिती होती. परंतु प्रेरक मंकड (नाबाद २५) आणि धमेंद्रसिंह जडेजा (नाबाद २४) यांनी सौराष्ट्रचा डाव सावरला.