वृत्तसंस्था, नागपूर

फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीमुळे विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटकविरुद्ध आपली बाजू दुसऱ्या दिवशी भक्कम केली आहे.विदर्भाच्या पहिल्या डावातील ४६० धावांना उत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेरीस कर्नाटकची २ बाद ९८ अशी स्थिती होती. रवीकुमार समर्थ ४३, तर निकिन जोसे २० धावांवर खेळत होते. कर्णधार मयांक अगरवालला खातेही उघडता आले नाही. कर्नाटक अजून ३६२ धावांनी पिछाडीवर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यापूर्वी, विदर्भाला प्रत्येक फलंदाजांच्या किमान विशीतल्या खेळीचा भक्कम आधार मिळाला. पहिल्या दिवसअखेर खेळपट्टीवर असणारी करुण नायर आणि अक्षय वाडकर ही जोडी दुसऱ्या दिवशी लगेच फुटली. अक्षय १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर करुणने एक बाजू लावून धरली. परंतु शतकाच्या उंबरठय़ावर तो बाद झाला. त्याने १७८ चेंडूंत ९० धावांची खेळी केली. शेवटी उमेश यादवने दिलेल्या १९ चेंडूंतील २१ धावांचा तडाखाही विदर्भासाठी महत्त्वाचा ठरला. त्यामुळे त्यांना साडेचारशे धावांचा टप्पा ओलांडता आला.