आगरतला : महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ‘क’ गटात सलग तिसऱ्या विजयाची संधी आहे. महाराष्ट्राला त्रिपुराविरुद्धच्या लढतीत विजयासाठी अजून १०१ धावांची गरज असून ८ फलंदाज बाकी आहेत.

स्वप्नील गुगले (खेळत आहे ५५) आणि अंकित बावणे (खेळत आहे २३) यांनी अर्धशतकी भागीदारी केल्याने महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात २ बाद १०३ धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी, आशय पालकर याने पाच बळी आणि मुकेश चौधरी याने तीन बळी घेतल्याने त्रिपुराचा दुसरा डाव २९० धावांवर रोखला गेला. महाराष्ट्रासमोर त्यामुळे विजयासाठी २०४ धावांचे आव्हान निश्चित झाले. त्रिपुराकडून कर्णधार मिलिंद कुमारने ६७ धावा फटकवल्याने यजमानांना २०० धावांचा पल्ला ओलांडता आला. महाराष्ट्राने याआधी झारखंडविरुद्ध नागोठणे येथे आणि आसामविरुद्ध गुवाहाटी येथे विजय मिळवले होते. सलग तिसऱ्या विजयाची संधी त्यामुळे आहे.

संक्षिप्त धावफलक :

त्रिपुरा : (पहिला डाव) सर्व बाद १२१ आणि (दुसरा डाव) सर्व बाद २९० (पल्लब दास ७७, मिलिंद कुमार ६७; आशय पालकर ५/६२)

महाराष्ट्र : (पहिला डाव) सर्वबाद २०८ आणि २ बाद १०३ (स्वप्नील गुगले नाबाद ५५, अंकित बावणे नाबाद २३; राणा दत्ता २/२५).

मुंबईच्या लढतीतील तिसरा दिवसही वाया

धरमशाला : मुंबई आणि हिमाचल प्रदेश यांच्या रणजी करंडकात ‘ब’ गटातील लढतीतील तिसरा दिवसही मैदान ओले असल्याच्या कारणास्तव वाया गेला आहे. दुसरा दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर तिसऱ्या दिवशीही मैदानावर मोठय़ा प्रमाणात पाणी होते. सकाळच्या वेळेत सूर्यप्रकाश होता मात्र दुपारच्या वेळेस पुन्हा आभाळ भरून आल्याने मैदानावरील पाणी सुखले नाही. अखेर पंचांना दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. मुंबईच्या पहिल्या डावात ५ बाद ३७२ धावा झाल्या असून सर्फराज खान नाबाद २२६ धावांवर खेळत आहे.