मुंबई : डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानी (७/९४ आणि ४/८२) आणि ऑफ-स्पिनर तनुष कोटियन (२/६० आणि ५/८२) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब-गटातील दुसऱ्या सामन्यात हैदराबादचा एक डाव आणि २१७ धावांनी तिसऱ्या दिवशीच धुव्वा उडवला. यंदाच्या रणजी हंगामातील मुंबईचा हा सलग दुसरा विजय ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी हैदराबादने पहिल्या डावात ६ बाद १७३ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यांचे उर्वरित चार बळी अवघ्या ४१ धावांची भर घालून बाद झाले. त्यामुळे हैदराबादचा पहिला डाव २१४ धावांवर आटोपला. हैदराबादकडून रोहित रायडूने (७७) सर्वाधिक धावा केल्या. मुंबईच्या संघाला पहिल्या डावात ४३७ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांनी हैदराबादला फॉलोऑन दिला.

दुसऱ्या डावातही हैदराबादला चांगली कामगिरी करता आली नाही. कर्णधार तन्मय अगरवाल (३९) आणि अक्षथ रेड्डी (२३) यांनी हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर राहुल बुद्धी (६५) आणि तनय त्यागराजन (नाबाद ३९) वगळता कोणत्याही फलंदाजाला फारशी चुणूक दाखवता आली नाही. त्यामुळे हैदराबादचा दुसरा डाव २२० धावांवर आटोपला. या वेळीही मुलानी आणि कोटियनच्या फिरकीसमोर हैदराबादच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. यापूर्वी, मुंबईने पहिल्या सामन्यात आंध्र प्रदेशवर नऊ गडी राखून विजय मिळवला होता.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ६ बाद ६५१ डाव घोषित

’ हैदराबाद (पहिला डाव) : ६५.१ षटकांत सर्वबाद २१४ (रोहित रायडू ७७), तनय अगरवाल ४०; शम्स मुलानी ७/९४, तनुष कोटियन २/६०)

’ हैदराबाद (दुसरा डाव) : ६७.२ षटकांत सर्वबाद २२० (राहुल बुद्धी ६५, तनय त्यागराजन नाबाद ३९; तनुष कोटियन ५/८२, शम्स मुलानी ४/८२)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy shams mulani shine mumbai beats hyderabad by an innings and 217 runs zws
First published on: 23-12-2022 at 02:14 IST