ला नुशिया (स्पेन) : भारताचा ग्रँडमास्टर रौनक साधवानीने नऊपैकी आठ गुणांची कमाई करत तिसऱ्या ला नुशिया आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. नऊ फेऱ्यांअंती नागपूरचा रौनक आणि दुसऱ्या स्थानावरील खेळाडूमध्ये एका गुणाचे अंतर होते. अखेरच्या फेरीत रौनकने स्पेनच्या ग्रँडमास्टर डॅनिल युफाला अवघ्या २० चालींमध्ये पराभूत केले. ग्रँडमास्टर कारेन ग्रिगोरयान (अर्मेनिया) आणि आंतरराष्ट्रीय मास्टर एर्नेस्टो जे फर्नाडेझ गुइलेन (क्युबा) यांनी सात गुणांसह अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. या स्पर्धेत सहभाग नोंदवणारा रौनक हा एकमेव भारतीय बुद्धिबळपटू होता आणि सलग दुसऱ्या वर्षी भारतीय खेळाडूने या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे.