भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला त्याची कसोटी जर्सी एका खास कारणास्तव भेट दिली आहे. या जर्सीवर इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील सर्व सदस्यांनी स्वाक्षरीही केली आहे. जडेजाने चॅरिटीसाठी ही जर्सी वॉनला दिली आहे. या गिफ्टबद्दल वॉनने जडेजाचे आभार मानण्यासाठी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या जर्सीचा फोटो शेअर केला.
वॉनने ही जर्सी त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे, ‘चिअर्स रवींद्र जडेजा, यामुळे चॅरिटीला आता भरपूर पैसे मिळतील.’ जडेजा इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे. सध्या ही पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरी आहे.

३२ वर्षीय जडेजाने मालिकेतील सर्व तीन कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, चौथ्या कसोटीत त्याची निवड होणे कठीण मानले जात आहे. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. नंतर खबरदारी म्हणून स्कॅनही करण्यात आले. २ सप्टेंबरपासून भारत-इंग्लंडमध्ये चौथी कसोटी खेळली जाईल.
हेही वाचा – दुसऱ्या देशाचा कर्णधार टीम इंडियाकडून खेळण्याचं पाहतोय स्वप्न; रणजीत ‘या’ राज्याकडून खेळणार
चौथ्या कसोटीत अश्विनला संधी?
जडेजाच्या जागी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला चौथ्या कसोटीत संधी मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे. भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार का नाही, हे स्पष्ट झालेले नाही. पण सरेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अश्विनला संधी मिळण्याची खात्री आहे. जर इशांत शर्मा बाहेर पडला, शार्दुल ठाकूर किंवा उमेश यादव यांना संधी मिळू शकते.