India vs England 5th Test: केनिंग्स्टन ओव्हलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी ४ मोठे बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज जोश टंगला या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात स्थान दिलं गेलं आहे. या संधीचा फायदा घेत, त्याने भारतीय फलंदाजांना आपल्या हवेत स्विंग होणाऱ्या चेंडूंमुळे अडचणीत आणलं आहे. दरम्यान त्याने साई सुदर्शन आणि रवींद्र जडेजा यांना बाद करत माघारी धाडलं आहे.
भारतीय संघाविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेत इंग्लंडने ४ बदल केले आहेत. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स आणि डॉसन यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर जोश टंग, एटकिंसन जेकब बेथल आणि जेमी ओव्हरटन यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान जोश टंगने आधी सेट झालेल्या साई सुदर्शन आणि त्यानंतर रवींद्र जडेजाला बाद करत माघारी धाडलं.
या सामन्यातील पहिल्या दिवशी पावसाने दमदार बॅटिंग केली. त्यामुळे भारतीय फलंदाजांची ये जा सुरू होती. याचा भारतीय फलंदाजांना चांगलाच फटका बसला. साई सुदर्शन चांगलाच सेट झाला होता. त्याने १०८ चेंडू खेळून काढले होते. पण जोश टंगच्या चेंडूवर त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं.
तर झाले असे की, साई सुदर्शन १०८ चेंडूंचा सामना करून ३८ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी ३६ वे षटक टाकण्यासाठी जोश टंग गोलंदाजीला आला. या षटकातील चौथा चेंडू त्याने गुड लेंथवर टाकला. जो टप्पा पडून सरळ राहिला. साई सुदर्शनने हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षक जेमी स्मिथच्या हातात गेला. त्याने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. त्यानंतर ४० व्या षटकात जोश टंगने पुन्हा एकदा तसाच चेंडू टाकला. पण यावेळी फलंदाज रवींद्र जडेजा होता. या चेंडूवरही जडेजाने चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेत यष्टिरक्षक जेमी स्मिथच्या हातात गेला. जडेजा अवघ्या ९ धावांवर माघारी परतला.