Ravindra Jadeja Statement on Australia ODI Squad Snub: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिकेत तो चेंडू आणि बॅटने कमालीची कामगिरी केली आहे. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजयातही जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतरही जडेजाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेतून वगळण्यात आलं आहे. याबाबत आता पहिल्यांदाच रवींद्र जडेजाने वक्तव्य केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी स्टार अष्टपैलू रवींद्रची निवड करण्यात आली नाही. निवडकर्त्यांच्या या निर्णयामुळे चाहते आणि क्रिकेट तज्ञ सर्वच गोंधळात पडले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि चेंडू दोन्हीकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाने दिल्ली कसोटीदरम्यान पहिल्यांदाच या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. त्याने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनाही प्रश्न विचारला.
दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसानंतर पत्रकार परिषदेत, भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने २०२७ च्या विश्वचषकाबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. एकदिवसीय संघातून वगळल्याबद्दल विचारले असता, जडेजा म्हणाला, “हे माझ्या हातात नाही. नक्कीच, मला २०२७ चा विश्वचषक खेळायचा आहे. पण शेवटी संघ व्यवस्थापन, निवड समिती, प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी काहीतरी विचार केला असेल, ज्यामुळे त्यांनी मला या मालिकेसाठी संघात निवडलं नाही. त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल.”
“संघ जाहीर झाला हे पाहून…”, रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलिया वनडे संघातून वगळल्याबाबत काय म्हणाला?
जडेजा म्हणाला, “त्यांनी माझ्याशी या निर्णयाबद्दल चर्चा केली होती. म्हणजेच संघ जाहीर झाला तेव्हा माझी निवड केली नव्हती हा माझ्यासाठी धक्का नव्हता. ही चांगली गोष्ट आहे की कर्णधार, निवड समिती आणि प्रशिक्षकांनी मला त्यांच्या विचारांबद्दल आणि निर्णयामागील कारणांबद्दल सांगितलं. मी त्याबद्दल समाधानी आहे,” असं जडेजा म्हणाला.
पुढे बोलताना जडेजा म्हणाला, “पण पुढे जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी गेल्या अनेक वर्षांपासून जसं खेळत आलो आहे, तसंच सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. जसं तुम्ही मोठ्या स्पर्धेबद्दल, म्हणजेच विश्वचषकाबद्दल बोललात, तर जर मला खेळण्याची संधी मिळाली, त्याआधी काही एकदिवसीय सामने असतील. त्या सामन्यांमध्ये जर मी चांगली कामगिरी केली आणि विश्वचषकात संधी मिळाली, तर ते संघासाठी खूप चांगलं ठरेल.”
“विश्वचषक जिंकणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मागच्या ५० षटकांच्या विश्वचषकात आपण थोडक्यात अपयशी ठरलो, त्यामुळे यावेळी शक्य झालं तर जे अपूर्ण राहिलं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू,” असं जडेजा म्हणाला.