IND vs ENG भारत-इंग्लंड कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाला एकही विकेट मिळवता आली नाही. बेन डकेट आणि झॅक क्राऊली यांनी ११७ धावांची भागीदारी रचली असून दोघेही नाबाद परतले आहेत. खेळपट्टीकडून भारतीय गोलंदाजांना पहिल्या सत्रात बिलकुल मदत मिळाली नाही. तर चेंडूचा आकारही बदललेला असल्याने भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात अडथळा येत होता.

दुसऱ्या डावात टीम इंडिया गोलंदाजी करत असताना, १४ व्या षटकात, सिराजने शुबमन गिलला चेंडूचा आकार खराब असल्याचे सांगितले. यानंतर, शुबमन गिल पंचांकडे गेला आणि चेंडू बदलण्याची मागणी केली पण पंचांनी त्यांचं ऐकलं नाही.

दुसऱ्या डावात चेंडू बदलण्याची टीम इंडियाची मागणी पंचांनी फेटाळून लावली. पहिल्या डावातही असंच काहीसं दिसून आलं होतं. पहिल्या डावातही टीम इंडियाने दोनदा चेंडू बदलण्याची मागणी केली होती. दोन्ही वेळा पंचांनी ती मागणी मान्य करण्यास नकार दिला. याचर्चेदरम्यानच पंचांच्या निर्णयावर ऋषभ पंतने वैतागून चेंडू फेकला, म्हणूनच त्याला आयसीसीने फटकारलं.

टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी सातत्याने चेंडू बदलण्याची मागणी केली होती. चेंडूचा आकार बदलल्याने तो स्विंग किंवा सीम होत नव्हता, ज्यामुळे इंग्लंडचे फलंदाज सहज धावा करत होते. अखेरीस मोठ्या विनंतीनंतर आणि मागणीनंतर पंचांनी भारतीय खेळाडूंची मागणी मान्य केली आणि चेंडू बदलून घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र जडेजाचं २८वं षटक सुरू होण्यापूर्वी त्याने पंचांना चेंडू तपासण्यासाठी दिला होता. यावेळेस चेंडू गेजमध्ये म्हणजेच चेंडूचा आकार तपासणाऱ्या रिंगमध्ये अडकून राहिला आणि पंचांनी दुसरा चेंडू देण्याचं मान्य केलं आणि चेंडू सोपवला. यानंतर जडेजाने पंचांकडे बघत त्यांना चि़डवलं की मी चेंडू बदलून दाखवला. पंचही आधी जडेजाची प्रतिक्रिया पाहून चकित झाले. नंतर जडेजाही हसू लागला. जडेजाच्या या प्रतिक्रियेचा व्हीडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत.