आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू होईल. या स्पर्धेसाठी बहुतेक संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये पोहोचले आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल हे भारतीय खेळाडू विलंबाने यूएईमध्ये त्यांच्या फ्रेंचायझीमध्ये सामील होतील. हे खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा सुरू होण्यास केवळ २० दिवस शिल्लक असताना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे.

आरसीबीचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर बोटाच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडला आहे. सुंदरच्या जागी बंगालचा क्रिकेटपटू आणि आरसीबीचा नेट गोलंदाज आकाशदीपला स्थान देण्यात आले आहे.

 

हेही वाचा – भारताच्या अष्टपैलू क्रिकेटपटूनं घेतली निवृत्ती.! संघात ‘कमबॅक’ करण्यासाठी सुरू होती धडपड

इंग्लंड दौऱ्यादरम्यान सुंदरला झाली होती दुखापत

आरसीबीचा संघ २० सप्टेंबर रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. जुलैमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर प्रथम श्रेणीच्या सराव सामन्यादरम्यान सुंदर दुखापतग्रस्त झाला होता.

सराव सामन्यात काउंटी सिलेक्ट इलेव्हनकडून खेळताना मोहम्मद सिराजच्या एका बाउन्सरमुळे सुंदरली ही दुखापत झाली. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून खेळण्याचे त्याचे स्वप्नही भंगले. या मालिकेसाठी सुंदरची अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून निवड झाली. सुंदरने आयपीएलमध्ये ४२ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्ससह आयपीएलमध्ये कारकीर्द सुरू केली. २०१८मध्ये तो आरसीबीमध्ये सामील झाला.