scorecardresearch

क्वॉलिफायर २ पूर्वी दिनेश कार्तिकला खावी लागली बोलणी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

दिनेश कार्तिकला कोलकाता येथील लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या संघाच्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे.

dinesh karthik
दिनेश कार्तिक (फोट क्रेडिट- iplt20.com)

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएल २०२२ या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्वॉलिफायर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. हा सामना जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून क्वॉलिफायर २ मध्ये धडक मारली आहे. आयपीएलच्या या हंगामात दिनेश कार्तिक बंगळुरूसाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरला आहे. त्याने आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या लढतींमध्ये आरसीबीला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे आजच्या क्वॉलिफायर सामन्यातही सर्वांच्या नजरा त्याच्याकडे असणार आहेत. मात्र, सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकसाठी एक वाईट बातमी मिळाली आहे. त्याच्यावर आयपीएल आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज दिनेश कार्तिकला कोलकाता येथील लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या संघाच्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

मात्र, त्याने नेमका कोणता गुन्हा केला याचा उल्लेख केलेला नाही. ‘ दिनेश कार्तिकने आयपीएल आचारसंहितेतील नियम २.३ अंतर्गत लेव्हल एकचा गुन्हा केला आहे. त्याने गुन्हा मान्य करून शिक्षा स्वीकारली आहे,’ असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आचारसंहितेनुसार लेव्हल एकच्या गुन्ह्यात सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक मानला जातो.

दिनेश कार्तिकने आरसीबीसाठी या हंगामात अनेक उपयुक्त खेळी केल्या आहेत. आतापर्यंत त्याने १५ सामने खेळून ३२४ धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला तब्बल तीन वर्षांनी भारतीय संघात परतण्याची संधी मिळाली आहे. ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी त्याचा भारतीय चमूमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rcb kipper dinesh karthik sanctioned for breaching ipl code of conduct before qualifier 2 vkk

ताज्या बातम्या