Who Will Buy The Most Expensive Team In IPL History: आयपीएलच्या इतिहासातील लोकप्रिय असलेल्या संघांपैकी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला नवा मालक मिळणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली जेतेपद पटकावणाऱ्या संघाला खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आरसीबी हा आयपीएलमधील सर्वात महागडा संघ आहे, त्यामुळे संघ खरेदी कोण करणार यावर सर्वांची नजर आहे. आरसीबीला खरेदी करण्यासाठी उत्सुक खरेदीदार कोण आहेत, जाणून घेऊया.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक, डियाजियो यांनी विक्री प्रक्रिया सुरू केली आहे आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत विक्री पूर्ण होण्याची शक्यता आहे. डियाजियोने स्वतः बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला याबद्दल माहिती दिली. आरसीबी संघाची ब्रँड व्हॅल्यू अंदाजे २६९ दशलक्ष आहे. ५ प्रमुख नावं समोर आली आहेत, जी आरसीबी विकत घेण्यासाठी उत्सुक आहेत.

काही महिन्यांपूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ बनल्याची बातमी आली होती. वृत्तानुसार, १.२ बिलियन डॉलर्स म्हणजेच १० हजार कोटींपेक्षाही जास्त किंमत संघाची आहे. आरसीबी विकत घेण्यासाठी ५ मोठे खरेदीदार सध्या शर्यतीत आहेत, याची माहिती क्रिकबझने दिली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या पाच प्रमुख नावांची माहिती क्रिकबझने दिली आहे. यामध्ये अमेरिकेतील एक खाजगी गुंतवणूक कंपनी, अदानी ग्रुप, जेएसडब्ल्यू ग्रुपचे जिंदाल आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे आदर पूनावाला व देवयानी इंटरनॅशनल ग्रुपचे रवी जयपुरिया यांचा या यादीत समावेश आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विकत घेण्यासाठी उत्सुक खरेदीदार

अमेरिकेतील खाजगी गुंतवणूक कंपनी
अदानी ग्रुप
आदर पुनावाला
JSW ग्रुप
देवयाना इंटरनॅशनल ग्रुप

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय संघ असूनही, आरसीबीने गेल्या १७ वर्षांत पहिल्यांदा जेतेपद पटकावलं. संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेलसारखे सारखे प्रभावी खेळाडू असतानाही संघ ट्रॉफी उंचावण्यात मागे राहिला. पण आयपीएल २०२५ मध्ये, संघाने जेतेपदाचा दुष्काळ संपवत रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आरसीबीने पहिलं जेतेपद पटकावलं.

आयपीएल इतिहासात एकाच संघाकडून सर्व सीझन खेळणारा एकमेव खेळाडू असलेला विराट कोहलीही संघाने जेतेपद पटकावल्यानंतर मैदानावर रडताना दिसला. देशभरात आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा केला. पण त्यांच्या घरच्या मैदानावर मात्र या विजयी परेडला गालबोट लागलं. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. तेव्हापासून आरसीबीच्या विक्रीच्या अफवा पसरल्या आहेत.