इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२१ च्या पर्वामध्ये अंतिम सामना खेळणारा पहिला संघ चेन्नईचा ठरला आहे. रविवारी दिल्लीवर मिळवलेल्या विजयामुळे चेन्नईने नवव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारलीय. मात्र अद्याप चेन्नईला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु किंवा कोलकाता नाइट रायडर्स अंतिम फेरीत टक्कर देणार की पुन्हा दिल्लीच चेन्नईसमोर उभी राहणार यासंदर्भातील निर्णायक सामना आज होणार आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात ‘एलिमिनेटर’चा सामना रंगणार आहे. या लढतीत पराभूत संघाचे आव्हान स्पर्धेमधून संपुष्टात येणार असल्याने दोन्ही संघांतील खेळाडू विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील यात शंका नाही. मात्र हे दोन्ही संघ आतापर्यंत २९ वेळा समोरासमोर आले आहेत या आकडेवारीमध्ये सध्या कोणाचं पारडं अधिक जड आहे हे पाहूयात…
रॉयल चँलेंजर्स बंगळुरुबद्दल बोलायचं झाल्यास ते मागील वर्षी एलिमिनेटरच्या सामन्यात हैदराबादकडून पराभूत झाले होते आणि स्पर्धेच्या बाहेर पडलेले. यंदा मात्र त्यांना ही चूक टाळण्याची आणि आयपीएल चषकाच्या एक पाऊल जवळ जाण्याची संधी आहे. मात्र त्यांच्यासमोर असलेला कोलकात्याचा संघही तिकाच दमदार आहे. त्यामुळे आरसीबीला हा सामना संपूर्ण ताकदीने खेळावा लागणार आहे. युएईमध्ये दुसऱ्या पर्वामधील उर्वरित सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत कोलकात्याने आपलं स्थान अंतिम चार संघांमध्ये निश्चित केलं आहे.
या पर्वातील कामगिरी कशी?
आतापर्यंत या सिझनमध्ये म्हणजेच आयपीएल २०२१ मध्ये दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात खेळताना प्रत्येकी एक सामना जिंकलाय. मात्र एकंदरित विचार करायचा झाल्यास आतापर्यंत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर २९ वेळा आले असून यामध्ये केकेआरचं पारडं जड दिसत आहे.
एकूण सामन्यांमध्ये कामगिरी कशी?
केकेआरने या आयपीएलच्या २९ पैकी १६ सामने जिंकलेत तर आरसीबीला १३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आलाय. मात्र विराटसाठी समाधानाची बाब ही आहे की मागील पाच वेळेपैकी चार वेळा आरबीसीबीने केकेआरला पराभूत केलंय. यंदा शारजामध्ये झालेल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात प्रत्येकी एक विजय मिळवलाय.
हे आकडे पाहता विराट आधी गोलंदाजीच घेईल
या दोन्ही संघांच्या सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना केकेआरने सात वेळा विजय मिळवलाय. तर आरसीबीला अशी कामगिरी तीनदाच करता आलीय. या उलट दुसऱ्यांदा फलंदाजी करताना आरसीबीची जिंकण्याची सरासरी ही केकेआरपेक्षा अधिक आहे. दुसऱ्यांदा बँटिंग करताना म्हणजेच धावांचा पाठलाग करताना आरसीबीने तब्बल १० वेळा कोलकात्याला पराभूत केलं आहे. तर कोलकात्याला नऊ वेळा हे साध्य करता आलंय. म्हणूनच नाणेफेक जिंकल्यास विराट आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे.
आरसीबीचे स्टार खेळाडू कोण?
विराट कोहली यंदाच्या हंगामानंतर बेंगळूरुच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली बेंगळूरुने १४ पैकी नऊ सामने जिंकून तिसऱ्या स्थानासह बाद फेरी गाठली आहे. कोहलीव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल असे एकापेक्षा एक गोलंदाजांवर तुटून पडणारे स्फोटक फलंदाज बेंगळूरुच्या ताफ्यात आहेत. अखेरच्या साखळी लढतीत के. एस. भरतच्या स्वरूपात नवा तारा गवसल्याने बेंगळूरुची फलंदाजी अधिक बळकट झाली आहे.
विराटकडे शेवटची संधी
स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक ३० बळी मिळवणारा हर्षल पटेल आणि यजुर्वेंद्र चहल बेंगळूरुसाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये बंगळुरुच्या संघामध्ये अधिक समतोल दिसून येत आहे. कर्णधार म्हणून आतापर्यंत आयपीएलची एकही स्पर्धा जिंकून न देऊ शकल्याचा ठपका पुसण्यासाठी विराट कोणतीच कसर यंदा सोडणार नाही असं म्हटलं जातं आहे. मात्र प्रत्यक्ष सामन्यामधील कामगिरीवरच आरसीबी पुढे जाणार की बाहेर पडणार हे ठरेल.
कोलकाता मजबूत संघ
साखळी सामन्यांमधील अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चितीसंदर्भात शंका असणारा ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील संघ बंगळुरुविरोधात आज मैदानात उथरणार आहे. कोलकाताने राजस्थानचा धुव्वा उडवून बाद फेरीतील स्थान पक्के केले. गेल्या दोन सामन्यांत अर्धशतक झळकावणारा शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या सलामी जोडीवर कोलकाताची प्रामुख्याने भिस्त आहे. आंद्रे रसेलच्या अनुपस्थितीत सुनील नरिन अष्टपैलू खेळाडूची भूमिका चोख बजावत आहे.
गोलंदाजीत भन्नाट कामगिरी
वरुण चक्रवर्तीच्या फिरकीपासून बेंगळूरुला सावध राहावे लागणार आहे. बंगळुरुपेक्षा कोलकात्याच्या कामगिरीमध्ये सातत्य कमी असलं तरी या सामन्यामध्ये कोलकाता स्वत:ला झोकून देणार हे मात्र नक्की. त्यामुळेच आता पुन्हा अंतिम सामन्याआधी दिल्लीसमोर कोणाता संघ जातो हे आजच्या सामन्यानंतर निश्चित होईल.