मुंबईच्या क्रीडा विश्वातल्या महत्त्वपूर्ण स्पर्धापैकी एक अशा मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला गुरुवारी दिमाखात सुरुवात झाली. पुरुषांमध्ये आरसीएफ, युनियन बँक, देना बँक या संघांनी विजयी सलामी दिली. महिलांमध्ये डॉ. शिरोडकर संघाने दणदणीत विजयासह दणक्यात सुरुवात केली.
गोरेगावच्या सन्मित्र क्रीडा मंडळाच्या पटागणांवर विद्युत प्रकाशझोतात रंगलेल्या मुकाबल्यांमध्ये चाहत्यांना दर्जेदार खेळाची पर्वणी मिळाली. महिला गटाच्या लढतीमध्ये बलाढय़ डॉ. शिरोडकर संघाने शिवनेरी संघावर ३२-२० असा विजय मिळवला. मध्यंतरालाच शिरोडकर संघाने १९-६ अशी आघाडी घेतली होती. स्नेहल साळुंखे आणि सुजाता काळगावकर शिरोडकरच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. युनियन बँकेने मुंबई महानगरपालिका संघाला २१-११ असे नमवले. या विजयात रोहित सेठ, नितीन कुंभार आणि तेजस बोरांगडे चमकले. मध्यंतराला महापालिका संघाकडे ७-६ अशी निसटती आघाडी होती, मात्र मध्यंतरानंतर आक्रमणावर भर देत युनियन बँकेने बाजी मारली. देना बँकेने मुंबई पोलीस संघावर २२-१४ अशी मात केली. मध्यंतराला पोलीस संघाकडे असलेली आघाडी भरून काढत देना बँकेने सरशी साधली. आरसीएफने बेस्ट संघाला चुरशीच्या मुकाबल्यात २७-२५ असे नमवले. सुदेश कुळेचा अष्टपैलू खेळ आरसीएफच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
आरसीएफ, युनियन बँकेची विजयी सलामी
मुंबईच्या क्रीडा विश्वातल्या महत्त्वपूर्ण स्पर्धापैकी एक अशा मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला गुरुवारी दिमाखात सुरुवात झाली.
First published on: 07-03-2014 at 05:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcf bank union bank wins in kabaddi