जमैकाचा जगद्विख्यात धावपटू युसेन बोल्टने २०१६मध्ये रियो डी जानेरो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेनंतर निवृत्तीचे संकेत दिले आहेत. परंतु तोपर्यंतच्या तीन वर्षांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवणे आणि २०० मीटर शर्यतीत स्वत:च्या विश्वविक्रमी वेळेला मागे टाकणे, हे ध्येय बोल्टने जोपासले आहे. २०० मीटर शर्यतीमधील १९.१९ सेकंदांचा विश्वविक्रम बोल्टच्या नावावर आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदक जिंकल्यानंतर वेगाच्या शर्यतीत बोल्टचीच जणू मक्तेदारी आहे. ‘‘मी सध्या कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. त्यामुळे २०१६च्या ऑलिम्पिकनंतर निवृत्ती पत्करणे योग्य ठरेल,’’ असे बोल्टने सांगितले. ‘‘मी नोंदवलेला १०० मीटरचा विश्वविक्रम मोडणे अवघड आहे. कारण ते अधिक तांत्रिक आहे. परंतु २०० मीटर शर्यतीत मला वेळेत सुधारणा करणे शक्य आहे,’’ असे तो म्हणाला.